मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे लोणावळा येथे पोहचले आहेत. त्यानंतर जरांगे हे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करत मुंबई गाठणार आहेत. मात्र, जरांगे यांची रॅली मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोहचण्यापूर्वीच पोलिसांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कारण, लोणावळा येथे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दोन्ही मार्गांवर पोलिसांची कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. जलद कृती दल आणि बॉम्ब निकामी पथकही तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे, मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून परवानगी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे.
मनोज जरांगे यांच्या मुंबईकडे जाणाऱ्या मराठा आरक्षण रॅलीनुसार मराठा आरक्षण समर्थकांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जायचे आहे. परंतु, पोलिसांनी त्यांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे, नवीन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आता जरांगे यांची आरक्षण रॅली कोणत्या मार्गाने जाणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.