रामल्लला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचा आनंदोत्सव
सोलापूर दि. २२ : जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील श्री दंडवते महाराज मठात श्री विष्णुसहस्त्रनामाचे १००८ वेळा पारायण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बंगळुरू येथील श्रीमद उत्तरादी मठाचे मठाधिपती श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरादी मठ विश्व मध्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते.
अयोध्या येथील प्रभू श्री रामलल्ला यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सद्गुरु श्री दंडवते महाराज मठात अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. प्रवेशद्वाराजवळ प्रभू श्रीराम यांची प्रतिमा उभारण्यात आली होती. फुलांची मनमोहक सजावट आणि आकर्षक रंगसंगतीची रांगोळी यांमुळे प्रसन्न वातावरणाची अनुभूती येत होती. अयोध्या येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भक्तांना दाखविण्यात येत होते.
सकाळी पारायण झाल्यानंतर सुंदरकांड तसेच श्री यंत्रोद्धारक स्तोत्रपठण पार पडले. त्यानंतर महिला मंडळातर्फे भजनसेवा करण्यात आली. रमा कुलकर्णी, धनश्री विधाते, मानसी देशमुख, नयन बळवंतराव, सृष्टी म्हेत्रे, मनस्वी सुर्डीकर, सुबोध कुलकर्णी, नामदेव गावडे, तनिष्का कुंभारे, सुनिल सर्जे यांनी भजने सादर केली.
आरव कस्तुरे, सिया बिडवई, अथर्व फुटाणे, स्वराज्य हिरेमठ या विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची हुबेहूब वेशभूषा साकारत भक्तांना आनंद दिला. शोभायात्रेनंतर हळदीकुंकू व दीपोत्सवाचा कार्यक्रमही झाला. प्रसाद वाटपाने या आनंदोत्सवाची सांगता झाली.