टंचाई परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रत्येक शासकीय विभागाने जबाबदारीने काम करावे
जिल्ह्यात चारा टंचाई भासू नये यासाठी नियोजन समिती मधून बियाणे खरेदीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करणार
सोलापूर :- टंचाई सदृश परिस्थितीच्या अनुषंगाने मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने प्रत्येक गावातील पाणी व चारा टंचाईचा सूक्ष्म आराखडा तात्काळ तयार करावा. टंचाईच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक शासकीय यंत्रणेने अत्यंत जबाबदारीपूर्वक काम करून टंचाई प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील टंचाईच्या परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, मंगळवेढा उपविभागीय अधिकारी अमित माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव, सांगोला तहसीलदार संतोष कणसे यांच्यासह संबंधित तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की माहे फेब्रुवारी ते माहे जून 2024 अखेरपर्यंतचा टंचाई आराखडा महिना निहाय तयार करत असताना गावनिहाय आवश्यक टँकरची संख्या, गावनिहाय पशुधन संख्या व त्यांना आवश्यक असलेला चारा उपलब्धता याविषयी सूक्ष्म नियोजन तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका पशुधन अधिकारी यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून करावी. तसेच उप विभागीय अधिकारी यांनी या अनुषंगाने तालुकास्तरावर स्वतंत्र बैठका घ्याव्यात व पुढील पंधरा दिवसात दोन्ही तालुक्यांचा टंचाईचा सूक्ष्म आराखडा गावनिहाय सादर करावा. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून टंचाई प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून नागरिकांना पाणी, काम व जनावरांना चारा उपलब्ध करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
प्रत्येक तालुकास्तरीय यंत्रणांनी पाणी स्त्रोताची माहिती घ्यावी, टँकर फीडिंग चे पॉईंट सर्च करून ठेवावेत. जनावरांची संख्या गावनिहाय लक्षात घेऊन चारा कधीपर्यंत पुरेल याचे नियोजन करावे. तसेच गावनिहाय सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करून तात्काळ सादर करावी. अशा शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडून त्वरित चारा बियाणे उपलब्ध करण्यात येणार आहे. चारा बियाणे खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 1 कोटी 92 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला असून पशुसंवर्धन विभागाने आणखी 2 कोटीचा प्रस्ताव त्वरित सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.
यापूर्वी टंचाई परिस्थिती निर्माण झालेली असताना मंगळवेढा व सांगोला तालुक्यात ज्या पद्धतीने उपायोजना करण्यात आल्या होत्या त्याचा व्यवस्थित अभ्यास करून माहे फेब्रुवारी 2024 पासून महिना निहाय पाणी व चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन करावे. मागील वेळी कोणत्या गावांमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कामांची मागणी आलेली होती त्याची माहिती घेऊन त्या गावातील सध्याची परिस्थिती व सेल्फ वरील कामांची उपलब्धता ठेवावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या. तर महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी मंगळवेढा व सांगोला तालुका प्रशासनाने टंचाईच्या पार्श्वभूमीवर दिलेली माहिती बैठकीत सादर केली
मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने प्रत्येक गावाचा गावनिहाय पाणी व चारा उपलब्धता आराखडा तयार करून विहित मुदतीत सादर करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी अमित माळी यांनी दिली. तसेच सद्यस्थिती टंचाई च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशाधीन शेळकंदे यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन्ही तालुक्यात 912 कामे सेल्फवर असल्याची माहिती दिली. सांगोला तालुक्यात 15 मे 2024 पर्यंत चारा कमी पडणार नाही तर मंगळवेढा तालुक्यात पुढील 61 दिवस चारा कमी पडणार नाही अशी माहिती संबंधित तालुका पशुधन अधिकारी यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाणी व चारा टंचाई बरोबरच दुष्काळी परिस्थितीत देण्यात येणाऱ्या सवलतीची अंमलबजावणी, रोहयो अंतर्गत रोजगाराचे केलेले नियोजन, जलयुक्त शिवार अभियान, पी एम किसान योजना व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई च्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेऊन संबंधितांना मार्गदर्शक सूचना दिल्या.
जलयुक्त शिवार अभियान पहिल्या टप्प्यातील मंगळवेढा तालुक्यातील दुरुस्तीचे 25 कामे व सांगोला तालुक्यातील दुरुस्तीची 21 कामांचे कार्यारंभ आदेश जानेवारी आखेर पर्यंत झाले पाहिजेत तर उर्वरित कामांची तपासणी त्वरित करून त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले.