येस न्युज नेटवर्क : नोव्हेंबर अखेरीस झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील सुमारे १२ लाख ८७ हजार हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे १,३७९ कोटी रुपयांची भरपाईची मागणी केली आहे. राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून ही भरपाई देण्यात येणार असून, याचा लाभ राज्यातील २३ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. ही मदत लवकरात लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
सुमारे २४ लाख शेतकऱ्यांना फटका
अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यानंतर तब्बल दीड महिना उलटूनही राज्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे रखडले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर कृषी विभागाने तातडीने हा अहवाल पूर्ण करून राज्य सरकारला सादर केला. त्यानुसार राज्यातील १२ लाख ८७ हजार १८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या आपत्तीमुळे राज्यातील २३ लाख ९० हजार ५७१ शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाने सादर केलेल्या या अहवालानुसार १३७९ कोटी ७७ लाख ७१ हजार रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.