सोलापूर ९ :- लोकांना जगण्यासाठी अत्यावश्यक सुविधांमध्ये अन्नधान्य हे अत्यंत महत्वाचे असून सरकार देशातल्या सर्व गरजू आणि सरसकट मागेल त्याला २ रुपये प्रमाणे गहू व ३ रुपये प्रमाणे तांदूळ, डाळ व खाद्यतेल देणे अत्यावश्यक आहे. तसेच सर्व असंघटीत उद्योगधंद्यातील कामगारांना रोख ५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे. कारण हाताला काम नसल्यामुळे उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झालेले आहे आणि कारखानदार तसेच कंपन्याचे मालक हे कामगारांना वाऱ्यावर सोडलेले आहे. त्यांचा खरा वाली मायबाप सरकारच आहे. म्हणून याबाबत ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तातडीचे पत्र पाठविले आहे.
या पत्रात अधोरेखित केले आहे कि, संपूर्ण जग आणि देश कोरोनाच्या महामारी विरुद्ध लढत आहे. याकरिता केंद्र आणि राज्य शासनाने १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन केलेलं आहे. या लॉकडाऊनमध्ये कामगारांना यंत्रमाग कारखानदार, विडी कारखानदार यांनी कसलीही नुकसान भरपाई न देता फक्त १ हजार रुपये उचल जाहीर केलेला आहे. त्यामुळे त्या लोकांची उपासमार चालू आहे. त्याकरिता सतत आपणापासून सगळेकडे केसरी शिधापत्रिकांना सवलतीच्या दरामध्ये धान्य देण्यासंबंधी विनंती केली होती. त्यास मंत्री मंडळाने धान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु ते धान्य ८ रुपये किलो गहू, १२ रुपये किलो तांदूळ देण्यात येणार आहे असे जाहीर केले. सदरचे धान्य २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात यावे. तसेच मोफत तांदूळ सुद्धा सर्व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात यावे, अशी विनंती मा. पंतप्रधान यांच्यासह राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. अन्नधान्य, नागरी पुरवठा मंत्री यांना केली आहे.