सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (बाटू) च्या सत्यशोधन समितीने तयार केलेला अहवाल चुकीचा असून, तो संबंधित कुलगुरूंकडे सादरच करण्यात आला नाही, अशी माहिती भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (बिगसी) प्राचार्य डॉ. बी. जे. पाटील यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे रायगडच्या प्रशासनाने नीरज अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय कमिटी नेमली होती. त्यातील एकच सदस्य कॉलेजमध्ये आले व त्यांनी अहवाल तयार केला. वास्तविक पाहता हा अहवाल ‘बाटू’ च्या कार्यकारी परिषद (एक्झिकेटिव्ह कौन्सिल) मध्ये सादर करण्यात आला नाही. अहवालास मंजुरी मिळाली नाही. हा अहवाल संबंधित – कुलगुरूंकडेही गेला नाही, त्यांनीही त्याला मंजुरी दिली नाही.

दहा लाखांचा दंड मी रुजू होण्यापूर्वीचा
मी २०१९ मध्ये बसव कॉलेज ऑफ इंडी येथे येथे प्राचार्य होतो. तेव्हा मी रुजू होण्यापूर्वी विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीने कॉलेजला १० लाखांचा दंड केला होता. मी पदभार घेतल्यानंतर या प्रकरणी कलबुर्गी खंडपीठ (कर्नाटक) मध्ये याचिका दाखल केली. कॉलेजचे गेलेले एक्झाम सेंटर पुन्हा मिळवले अन् झालेल्या दंडावर तडजोड करण्यात आली. बसव कॉलेजला दंड भरण्याची गरज भासली नाही. माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, असेही यावेळी प्राचार्य डॉ. बी. जे. पाटील यांनी सांगितले.