सोलापूर, (प्रतिनिधी):- समाजाच्या सुख दुखात नेहमी सहभागी होणाऱ्या बॅक ऑफ इंडियाने कोरोनाच्या संकटातही शासन आणि गरजू नागरीकांना मदतीचा हात पुढे केला आहे. सोलापूर विभागातील बॅक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी गरजू आणि गरीब नागरीकांसाठी अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तुंची मदत देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली सामाजिक भान जपण्याचाच प्रयत्न बॅक ऑफ इंडियाकडून करण्यात आल्याचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू यांनी सांगितले.
बॅक ऑफ इंडिया ही जिल्ह्याची अग्रणी बॅक म्हणून ओळखली जाते. बॅकेच्या माध्यमातून विविध वर्गाच्या लोकांना विविध सेवा देण्यात येतात. केवळ बँकींग हा उद्देश न ठेवता समाजाची उन्नती कशी करता येईल याकडे अधिक लक्ष बॅकेकडून देण्यात येते त्याचबरोबर सामाजातील प्रत्येक घटकाच्या सुख दुखातही सहभागी होण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या जगभरात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत आहे त्यामुळे देशात संपूर्णपणे संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. सोलापूरमध्येही सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत. त्या उद्योग व्यवसायातील गरीब कामगार मजूर कष्टकरी यांना अन्नधान्याची कमतरता जाणवत आहे याचीच जाणीव ठेवून बॅक ऑफ इंडियाने सोलापूर विभागातील सर्व शाखांमधून फूड पॅकेट वाटप करण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर नागरीकांना आवश्यक असलेले गव्हाचे पीठ, तांदूळ, दाळ, मीठ, तेल तसेच कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून हात धुण्यासाठीचे आणि कपडे धुण्याचे साबण असे पॅकेट तयार करून सोलापूरमध्ये 500, पंढरपूर 100, लातूर 100, नांदेड 100 असे वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे देण्यात आले. त्याचबरोबर भुकेने व्याकूळ झालेल्या बेघर असलेल्या लोकांसाठी 500 फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले असल्याचेही अजय कडू यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचे संकट दूर करण्यासाठी संपूर्ण देशवासियांसोबत बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी आहेत एकत्र येवून या संकटावर मात करू या बँकेच्या ग्राहकांनी आणि सर्वच नागरीकांनी आपापल्या घरात बसून एकमेकांमध्ये किमान 5 फूटाचे अंतर ठेवून आणि सतत हात धुवून स्वच्छता ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन बॅक ऑफ इंडियाचे सोलापूर विभागाचे उपव्यवस्थापक शैलेशचंद्र ओझा यांनी केले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सर्व फूड पॅकेट देताना बॅक ऑफ इंडिया अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक संतोष सोनवणे, वरिष्ठ व्यवस्थापक सचिन कुमार, व्यवस्थापक अमोल सांगळे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.