सोलापूर दि. 3 : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी करावी लागली आहे. या काळात स्थलांतरित मजूर, गरीब आणि गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य पुरवठा होईल याची व्यवस्था करा, अशी सूचना पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज येथे केली.
पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनांचा आढावा बैठकीत घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरवातीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यावर पालकमंत्री आव्हाड यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे गरीब, स्थलांतरित मजूर आणि निराधार लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. अन्नधान्याचा पुरेसा साठा करुन ठेवा. कमी पडत असल्यास आणखी मागवून घ्या. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी केशरी कार्डधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्य मिळत नसल्याबद्दल सांगितले. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि सचिव संजय खंदारे यांच्याशी चर्चा केली जाईल. धान्य मिळण्यासाठी प्रयत्न करु, असे आव्हाड यांनी सांगितले.
वैद्यकीय उपाययोजनेसाठी आवश्यक असणारी व्हेंटीलेटर, साधन आणि यंत्र सामग्री तत्काळ मागवून घ्या. पीपीई किट, सॅनिटायझर, यांचा पुरेसा साठा सर्व शासकीय दवाखान्यात उपलब्ध करुन घ्या. कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे का याची चाचणी करणारी रॅपिड टेस्ट किट उपलब्ध करुन घ्यावीत, अशा सूचना आव्हाड यांनी दिल्या.
निराधार, स्थलांतरित मजुरांना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्न उपलब्ध करुन द्या. यासाठी स्वयंसेवी संस्था, साखर कारखाने, उद्योजक, व्यावसायिक यांच्याकडून मदत घ्या. यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र निधी उभारण्यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले.
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाने सुरु ठेवावेत यासाठी आवाहन करावे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात किमान एक कम्युनिटी क्लिनिक सुरु करा. या क्लिनिकसाठी खासगी डॉक्टरांना आवश्यक असणारी जागा, साहित्य आणि औषधे द्यावीत, असे आव्हाड यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आदी उपस्थित होते.
पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या सूचना
- अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत करा.
- कम्युनिटी किचन, कम्युनिटी क्लिनिकस् सुरु करा.
- साखर कारखानदार, उद्योजक, व्यापारी, स्वयंसेवी संस्था यांची मदत घ्या.
- सोलापूर शहरात फवारणी करा.
- खासगी दवाखाने सुरु ठेवण्याचे आवाहन करावा.