येस न्युज नेटवर्क : उत्तरकाशीवरून महत्वाची बातमी येत आहे. ज्यांच्या सुटकेकडे गेली १७ दिवस भारतच नाही तर अवघे जग डोळे लावून बसले होते त्यांच्यापर्यंत एनडीआरएफची टीम पोहोचली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करूनही गेल्या १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात अपयश येत होते. अखेर भारतीय सैन्याने त्यांची सुटका केली आहे.
बोगद्यात खोदाई संपली असून अडकलेल्य़ा ४१ मजुरांपर्यंत ८०० मीमी व्यासाचा पाईप टाकण्यात आले आहेत. या पाईपमधून एनडीआरएफची टीम मजुरांपर्यंत पोहोचली आहे. बोगद्यामध्ये अॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरांना देखील बोलविण्यात आले आहे. सर्वच्या सर्व ४१ मजूर ठीक असावेत अशी प्रार्थना केली जात आहे. रेस्क्यू टीमने मजुरांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांचे कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितले आहेत. या मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार आहे. यासाठी एम्सच्या डॉक्टरांना ऋषीकेशमध्ये हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.