मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याशी मंत्री गिरीश महाजन यांनी सफोनवरून संपर्क केला. उपोषण करु नका, असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. तुम्ही एक महिना मुदत मागितली. तुमच्या शब्दाला मान देत आम्ही एक महिन्याऐवजी 41 दिवस दिले, आता अडचण काय आहे, आमचं काय चुकलं, असा सवाल जरांगे यांनी महाजन यांना केला आहे.
समितीचा अभ्यास सुरू असून आरक्षण लवकरच मिळेल, काहीतरी सकारात्मक होईल, साखळी ठेवा मात्र आमरण उपोषण नका करू, असं म्हणत गिरीश महाजन यांच्याकडून जरांगेना विनवणी करण्यात आली. समितीचा अभ्यास 40 वर्षांपासून सुरूच आहे, मराठा आंदोलकांवरील खटले दोन दिवसात मागे घेतो, ते अजून मागे घेतलेले नाहीत, असं प्रत्युत्तर जरांगे यांनी महाजन यांना दिलं आहे.
तुम्ही उपोषण मागे घ्या, आपण मार्ग काढू, मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर आहे. देऊन टाका, देऊन टाका, असं आरक्षण देता येणार नाही. आम्हाला असं आरक्षण द्यायचं आहे, त्याला कुणीही चॅलेंज करु शकत नाही. न्यायालयात आव्हान देता येणार नाही. त्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या, समाजाला आंदोलन उग्र करु नका, आत्महत्या करु नका, असं मराठा समाजाला आवाहन करण्याची मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.