सोलापूर, दि. १६ : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यांत येणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास त्याविरुध्द कारवाई करण्यात केली जाईल, असे या आदेशांत नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 15 मार्च 2020 रोजी जारी केलेले हे आदेश साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 च्या वापर करुन काढले आहेत. या आदेशानुसार चित्रपटगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह, वॉटरपार्क, वस्तूसंग्रहालय, शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा, महाविद्यालय व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, मनोरंजनाची ठिकाणे, पर्यटन केंद्रे इत्यादी बंद राहतील. मात्र सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामीण भागातील 10 वी व 12 वीच्या परीक्षा विहीत वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात. शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनामध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांनी आस्थापनामध्ये पूर्ण वेळ उपस्थित रहायचे आहे. पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नयेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
वरील आदेशाचे पालन न केल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्था भारतीय दंडसंहिता 1860 (45 )च्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानन्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
गर्दी टाळण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी गर्दी टाळावी, शासकीय कार्यालयामध्ये अत्यावश्यक गरज असल्याशिवाय जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले म्हणणे लेखी स्वरुपात टपाल शाखेत द्यावे अथवा [email protected] या ईमेलवर पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.