सोलापूर- राज्यात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 31 मार्चच्या अगोदर नियोजित असलेल्या सर्व परीक्षा रद्द केल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून यासंदर्भात सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार 17 ते 31 मार्च या कालावधीत होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातची माहीती विद्यापीठाकडून महाविद्यालयांना तसेच विद्यार्थ्यांना वेळोवळी कळविण्यात येईल अथवा विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही यासंदर्भात माहिती देण्यात येईल. याचबरोबर 17 ते 31 मार्च या कालावधीतील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा केव्हा होतील, या संदर्भांचीही माहिती लवकरच विद्यापीठाकडून देण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.
याचबरोबर 31 मार्चपर्यंत विद्यापीठात व संलग्नित महाविद्यालयात अध्यापनाचेही कार्य बंद राहणार आहे. वस्तीग्रह, ग्रंथालय बंद ठेवण्यात येणार आहे. शिक्षकांना 25 मार्चपर्यंत घरी राहून कामकाज करण्याची सवलत देण्यात येणार आहे. मात्र आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासकीय कारणास्तव अध्यापकांना वरिष्ठांच्या आदेशानुसार हजर राहणे बंधनकारक राहील. विद्यापीठाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नियमितपणे कार्यालयामध्ये उपस्थित राहून काम करणे आवश्यक आहे. यासंदर्भात वेळोवेळी आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाहीच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहितीही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी दिली.