सोलापूर : सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत उजनी धरण जलाशय उद्भव धरून पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आलेली आहे. सदर योजनेद्वारे सोलापूर शहरास दररोज १७० द. ल.ली. पाणी उपलब्ध होणार आहे. सदर योजनेत मुख्यत्वे धरण क्षेत्रात जॅकवेल बांधणे (४५ मी. X ३३ मी. x १८.५० मी.), पंपींग मशीनरी (११५० एच.पी. ६ नग), अशुद्ध पाण्याची दाब – नलिका (१५२४ मिमी व्यास १४ मिमी जाड एम.एस. पाईप लांबी २८.५० कि.मी.), बी.पी.टी. (क्षमता ६.५० लक्ष लिटर्स), अशुद्ध पाण्याची उतार नलिका (१४७३/१४२२/११६८ मिमी व्यास १२ मिमी जाड एम. एस. पाईप लांबी – ८१.५० कि.मी.) असे एकूण ११० कि.मी. पाईपलाईन, क्रासिंग्स (रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, ईतर रस्ते, कॅनाल, सीना नदी असे एकूण ६३ नग) इ. कामांचा समावेश आहे. हे काम १ जून २०२३ रोजी ठेकेदार पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनी हैदराबाद यांना देण्यात आले आहे.
सदर कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी २१ महिने आहे (नोव्हेंबर २०२४ अखेर). सदर योजनेचा आकृतीबंध स्मार्ट सिटी हिस्सा रू. २५० कोटी, NTPC हिस्सा रू. – २५० कोटी, महाराष्ट्र शासन (नगरोत्थान)- ३८२.६८ कोटी आहे. कामाची सध्याची स्थिती :-जॅकवेल–१८.५० मीटर खोलीचे उत्खनन पूर्ण पीसीसीचे काम पूर्ण, राफ्ट फाउंडेशनसाठी स्टील बाइंडिंगचे काम प्रगतीपथावर आहे. पाईप पुरवठा –आजपर्यंत ११० कि.मी. पैकी ४६.२० कि.मी. पाईप्सचा पुरवठा करण्यात आला आहे.पाईप अंथरणे–आजपर्यंत ११० कि.मी. पैकी ३५.७० कि.मी. पाईप अंथरले.हायड्रॉलिक टेस्टिंग–आजपर्यंत एकूण १६ कि.मी. पाईप लाईनचे हायड्रॉलिक टेस्टिंग पूर्ण झाले आहे.क्रासिंग्स– राष्ट्रीय महामार्ग -4,राज्य महामार्ग 1,ईतर रस्ते-2, कॅनाल-5 पूर्ण झाले आहे.अशी माहिती आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिले यावेळी स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी तथा उपअभियंता व्यंकटेश चौबे, पोचमपाडचे रंगा राव, एम.जी.पी चे एम.एस हरीश , विजयकुमार नलावडे, अरुण पाटील, देविदास मादगुंडे आदी उपस्थित होते.
सोलापूरकरांना 170 एमएलडी पाणी रोज उपलब्ध होणार : आयुक्त
उजनी ते सोरेगाव पर्यंत ही जलवाहिनी टाकण्याची महत्त्वपूर्ण योजना आहे. सुरू असलेल्या कामाची हायड्रोलिक टेस्टिंग व गुणवत्तेची तपासणी केली.या कामासाठी पाईप पुरवठा सुरु आहे . वर्क ऑर्डर मधील कराराप्रमाणे नोव्हेंबर 2024 पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार असले तरीही त्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्याचा शर्तीचा प्रयत्न राहणार आहे. यामुळे सोलापूरकरांना 170 एमएलडी पाणी रोज उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी दिली.