सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार शुक्रवारी प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी स्वीकारला. विद्यापीठाच्या जागतिक मानांकनासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
प्रभारी कुलगुरू तथा डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्याकडून त्यांनी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मावळते प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, स्वेरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा नियमित कुलगुरूपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. राजनीश कामत यांनी कामकाज पाहिले. आता राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी आज शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. डॉ. महानवर हे मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे कार्यरत होते. तसेच मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत होते. पदभार स्वीकारल्यानंतर कुलगुरू डॉ. महानवर यांचा विद्यापीठ प्रशासन तसेच अधिकारी, पदाधिकारी, विविध संस्था व संघटनातर्फे सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.