गेल्या १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं.
मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला आहे. तसेच, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे. त्याशिवाय, ज्यांच्या वंशावळीत कुणबी उल्लेख आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचंही सरकारने मान्य केलं आहे.
राज्य सरकारला महिन्याभराचा अवधी देण्याचा निर्णय बुधवारीच मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जोपर्यंत येत नाहीत. तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी संध्याकाळीच मनोज जरांगेंना भेटायला जाणार होते. मात्र, त्याआधी त्यांनी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवलं.
मुख्यमंत्री न आल्यामुळे बुधवारी संध्याकाळी मनोज जरांगेंचं उपोषण सुटू शकलं नाही. मात्र, आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सराटी गावात जरांगेंची भेट घेण्यासाठी निघाले आणि सकाळी ११ च्या सुमारास आंदोलनस्थळी दाखल झाले.