गावातील प्रत्येक व्यक्तीनी मोहिमेचा लाभ घ्यावा : मनीषा आव्हाळे
केंद्र शासनाची अत्यंत महत्वांकाक्षी मोहीम म्हणजे “आयुष्मान भव’ ही मोहिम असून सोलापुर जिल्हयामध्ये १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत राबविणेत येणार आहे. यामध्ये आयुष्मान कार्ड व आभा कार्ड बाबत जनजागृती करणे, आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोग इ. बाबत जनजागृती करणे तसेच आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर मिळणा-या सेवा सुविधांचे मुल्यमापन करणे हा मूळ उद्देश या मोहिमेचा असून गावातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत हि मोहीम पोहचून यशस्वी करावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.

दक्षिण तालूक्यातील होटगी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयुष्मान भव मोहिमेचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या .याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले ,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बिरुदेव दुधभाते,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, सहाय्यक संचालक कृष्टरोग डॉ. मोहन शेगर,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.मीनाक्षी बनसोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी जिल्हा आयुष अधिकारी डॉ.विलास सरवदे, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नीलम घोगरे, होटगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.व्ही.मिसाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत गडगी, प्रा.आ.केंद्राचे सर्व कर्मचारी तसेच होटगी गावातील प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी,उपसरपंच ,पोलीस पाटील ,ग्रामसेवक यांचेसह योजनेचे लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी आयुष्मान भव या मोहिमेची रूपरेषा व मोहीम यशस्वी करण्यासाठी करण्यात आलेली तयारी याबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा आयुष अधिकारी डॉ.विलास सरवदे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे अवयव दान प्रतिज्ञा घेतली व सूत्रसंचालन केले.
आयुष्मान भव मोहिमेचा शुभारंभ देशभरात एकाचवेळी महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला.तसेच राजभवन मुंबई येथून मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री , मा.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री,व वरिष्ट अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्यात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
पुढे बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे म्हणाल्या ,या मोहिमेत आयुष्मान आपल्यादारी , आयुष्मान सभा , आयुष्मान मेळावा व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी,रक्तदान व अवयव दान जनजागृती मोहीम , आदी उपक्रमा बरोबरच राज्य शासनाची वय वर्ष अठरा वरील पुरुषांसाठी “निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे “ सुरु केलेची माहिती दिली. सेवा सप्ताह बरोबरच सेवा पंधरवाडा साजरा करणे व दि २ ऑगस्ट रोजी आयुष्मान सभा सर्वत्र आयोजित करणेचे आवाहन केले.
या अनुषंगाने या उपक्रमांतर्गत सर्व जिल्हयांमधील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करुन आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात येणार आहे. आयुष्मान सभा उपक्रमांतर्गत गावपातळीवर आरोग्य सेवा सुविधांची जनजागृती करण्याकरीता ग्रामपंचायत व ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचा उपयोग करण्यात येणार आहे.महिन्याच्या प्रत्येक शनिवारी आयुष्मान मेळा आयोजन करून आरोग्यवर्धिनी केंद्रावर मधुमेह,उच्च रक्तदाब,तोंडाचा कर्करोग , स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग,क्षयरोग ,कृष्ठरोग व इतर संसर्गजन्य रोग ,पोषण व लसीकरण,माता व बाल आरोग्य तसेच आयुष्मान व आभा कार्ड तयार करणे ,सर्व समावेशक आरोग्य सेवा ,आयुष ,मानसिक आरोग्य,वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, मौखीक आरोग्य,नेत्र, नाक, कान व घसा यांचे आरोग्य, समुपदेशन सेवा, योग व वेलनेस उपक्रम, बालकांची मोफत आरोग्य तपासणी व शत्रक्रिया, मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी करण्यात येणार आहे.