सोलापूर – दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी स्मार्ट सिटी मिशन चे प्रकल्प संचालक कुणाल कुमार यांनी इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड कॉन्टॅक्स , 2022 च्या विजेत्यांची घोषणा केली. यामध्ये सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीच्या प्रकल्पातील कामांच्या अमलबजावणीाठी भारताच्या पश्चिम विभागात पारितोषिक घोषित करण्यात आले.
हा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी इंदोर येथे आयोजित करण्यात आला आहे. माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. पश्चिम विभागातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सोलापूर शहर व अहमदाबाद स्मार्ट सिटी दहा लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरांसाठी पारितोषिक घोषित झाले आहे. देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरीसाठी इंदोर, सुरत आणि आग्रा या शहरांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक घोषित करण्यात आले.
स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सोलापूर शहरामध्ये पाणी नियोजनासाठी स्काडा प्रणाली, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक जागांचा विकास, सौर ऊर्जा प्रकल्प, रस्ते विकास, पाण्याच्या पाईपलाईन बदलणे तसेच मैला पाण्याच्या पाइपलाइन बदलणे, सोमपा इंद्रभवन इमारत आणि लक्ष्मी मंडई येथील इमारत अशा पुरातन वास्तूंचे पुनरुज्जीवन करणे इत्यादी प्रकल्प हाती घेण्यात आले. उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम देखील स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राबविण्यात येत असून काम प्रगती पथावर आहे. सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पात राबविण्यात आलेल्या एकूण 47 प्रकल्पांपैकी 43 प्रकल्प पूर्ण झाले आहेत, चाळीस प्रकल्प महापालिकेत हस्तांतरित केले आहेत. असे उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे भारताच्या पश्चिम विभागात सोलापूर शहराला पारितोषिक घोषित करण्यात आले.