सोलापूर, दि.७- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून संशोधनाला अधिक गती व चालना देण्यासाठी तसेच संशोधक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी पीएच. डी. अभ्यासक्रमाकरिता प्रवेशासाठी पेट-९ च्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली.
विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीच्या १४ नोव्हेंबर 2022 च्या निर्देशानुसार पीएच. डी. पदवी संदर्भात प्राप्त अधिसूचनेनुसार नियमावली बनवण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अधिष्ठाता व तज्ञ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडून पीएच. डी. प्रवेशापासून ते पदवी प्रदान करण्याच्या प्रक्रियेपर्यंत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचनेनुसार एक नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावली संदर्भात आता प्राचार्य, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक व तज्ञांकडून आठ दिवसाच्या काल मर्यादेत सूचना मागविण्यात येत आहेत. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्राप्त योग्य सूचनेनुसार नियमावली निश्चित करण्यात येईल.
पीएच. डी. करण्यासंदर्भात नियमावली निश्चित झाल्यानंतर विषयनिहाय मार्गदर्शक तसेच संशोधक विद्यार्थ्यांची संख्या व इतर सर्व बाबी निश्चित होतील. त्यानुसार पीएच.डी प्रवेशासाठी पेट-९ ची जाहिरात निघेल. पुढील सप्टेंबर २०२३ मध्ये पेट ९ ची प्रक्रिया सुरू होईल आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी सांगितले.