सातारा ( सुधीर गोखले) – सातारा जिल्ह्याच्या पश्चिम विभागात पडत असलेल्या संततधार पावसामुळं आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं केळघर घाटात जेसीबी सारख्या मशीन लावून वाहतूक सुरळीत केली. मशिनरीच्या साहाय्यानं एका बाजूनं रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. जावळी तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पावसानं जोर धरला आहे. त्यामुळं डोंगरदऱ्यातून पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. तसेच केळघर घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
आज पहाटेच्या सुमारास वरोशी गावच्या हद्दीत चौपाळा शिवारात घाटात दरड कोसळून दरडीचे दगड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मोठ्या वाहनांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. एच. पवार यांनी तातडीने घाटात जेसीबी मशीन पाठवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, परिसरात पाऊस जास्त झाल्याने काही ठिकाणी नाले न खोदल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे .सातत्याने रस्त्यावरून पाणी जात असल्याने घाटातील रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत तसेच रस्ता खचण्याचीही भीती आहे. वर्दळीच्या केळघर घाटात वाहनांची नेहमी गर्दी असते मात्र, नागमोड्या वळणाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर नसल्याने घाटात वाहने चालवताना चालकांना वळणांचा अंदाज येत नाहीत. काही ठिकाणी अवघड वळणांवर संरक्षक कठडे नसल्यानेही अपघातांना निमंत्रण मिळत आहे. बांधकाम विभागाने दक्ष राहून केळघर घाटातील रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे.