पुणे : भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. बोंडे यांच्या टीकेनंतर आता त्यांना लायकीत राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनीही अनिल बोंडे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. हू इज अनिल बोंडे? असा सवालच विजय शिवतारे यांनी केला आहे. तसेच बोंडे यांनी लायकीत राहावं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
अनिल बोंडे यांची उंची किती आहे? अनिल बोंडे असं बोलले असीतल आणि एकनाथ भाई शिंदे यांना रेफर करून बोलले असतील तर चुकीचं आहे. अनिल बोंडे आणि मी मंत्री होतो. तेव्हा तेही मंत्री होते. त्यांची इमेज आणि बुद्धी काय हे मला माहीत आहे. त्यांनी असं विधान केलं असेल तर दुर्देवी आहे. कुणी टीका करावी याला महत्त्व असतं. कुणी उठसूट टीका करेल तर त्याला महत्त्व देण्याची गरज नाही. टीका तेवढ्या ताकदीच्या माणसाने केली असेल तर उत्तर दिलं पाहिजे. समज गैरसमज दूर केले पाहिजे, असं विजय शिवतारे यांनी सांगितलं.