मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतही जाणवतोय. मुंबईचा समुद्र खवळला आहे. 10 वाजून 21 मिनिटांनी समुद्राला भरती आली आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्हच्या समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहे. खबरदारी म्हणून मुंबईच्या सर्व चौपाट्या आणि sea-face बंद करण्यात आले आहेत. चौपाटींवर येणाऱ्या लोकांना पोलिसांकडून बाहेर जाण्याचा आवाहन केलं जात आहे. शिवाय जीवरक्षक ही चौपाट्यांवर खबरदारीचा उपाय म्हणून तैनात आहेत
बिपरजॉय चक्रीवादळ आज सध्याकाळी उशिरा गुजरातवर धडकणार आहे. हे चक्रीवादळ सध्या किनाऱ्यापासून 180 किमी अंतरावर आहे. 5 ते 6 किलोमीटर प्रति तास वेगानं ते गुजरातकडे सरकतंय. बिपरजॉय आता समुद्रात ज्या ठिकाणी आहे, तिथं वाऱ्याचा वेग ताशी 120 किमी एवढा आहे. मुंबईत समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणात जात असतात. त्यांनी पोहण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने समुद्रात शिरु नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खबरदारी करण्यात आली आहे. तरी देखील काही नागरिक समुद्रात जातात व प्रसंगी बुडण्याच्या काही घटना घडतात.
गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटीच्या ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेदरम्यान 60 प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तर दुपारी 3 ते रात्री 11 वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक काम करणार आहे. मुंबईला सुमारे 145 किलोमीटर लांबीचा अरबी समुद्राचा किनारा लाभला आहे. गिरगाव आणि दादर चौपाटी शहर विभागामध्ये तर जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटी पश्चिम उपनगरात आहेत. नागरिक तसेच पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात जाऊ नये, यासाठी प्रशिक्षित सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक आवाहन करणार आहे