सोलापूर शहर गुन्हे शाखेने येथील एसटी बसस्थानकावर महिलेचे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने पळविणार्या तीन महिलांना अटक केली असून चोरलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले आहेत.
शाहीरा दिलीप सकट ऊर्फ पाटील (वय 58), सोनम ऊर्फ सुमेधा मंजुनाथ कांबळे (वय 30), सरिता काशिनाथ ऊर्फ खासीम उपाध्ये (वय 32, तिघी रा.विठ्ठल मंदिर जवळ, बापूनगर, कलबुर्गी, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या तिघींची नावे आहेत. 11 मे रोजी दुपारी 12.30 वाजता सुस्मिता ऋषिकेश पाटील (रा. वाघोली, ता. मोहोळ) या सासरी वाघोली येथे जाण्याकरीता सोलापूर एस टी स्टॅन्ड येथे आल्या होत्या. त्या एस.टी. बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेऊन, तीन अनोळखी महिलांनी पाटील यांच्या पर्समध्ये ठेवलेले चार तोळ्याचे सोन्याचे गंठण व अडीच तोळ्याचे नेकलेस असे साडेसहा तोळे सोन्याचे दागिने चोरले होते. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एस.टी. स्टँड व परीसरात असलेल्या सुमारे 40 सी सी टी व्हि कॅमेर्याची पाहणी केली असता, त्यामध्ये तीन संशयीत महिला ह्या फिर्यादीच्या पर्स मधील दागिने चोरी करताना अस्पष्टरित्या दिसत होत्या. त्यावरून पथकाने संशयीत महिलांचा शोध घेत असताना त्यांना माहीती मिळाली की, या तीन महिला या कलबुर्गी येथील आहेत. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन दोन दिवस तपास करून त्या महिलांना बापूनगर, कलबुर्गी, येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता, त्यांनी ही चोरी केल्याचे कबुल करून, पाटील यांचे चोरी केलेले सोन्याचे गंठण व नेकलेस असे साडेहा तोळे सोन्याचे दागिने काढून दिले.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे , पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय क्षिरसागर, कृष्णात कोळी, महेश शिंदे, राजु मुदगल, कुमार शेळके, निलोफर तांबोळी, रत्ना सोनवणे, ज्योती लंगोटे, सुमित्रा बारबोले, सिध्दार्थ देशमुख, प्रकाश गायकवाड, वसीमशेख, बाळु काळे यांनी केली.