सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्याची तालुकास्तरीय खरिप हंगाम पूर्व नियोजन आढावा सभा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये संपन्न झाली. या बैठकीत विविध योजनांचा आढावा घेवून संभाव्य पेरणीनुसार आवश्यक खत, बी-बियाणे आदीबाबत आढावा घेतला.
यावेळी बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी जयवंत कवडे, तहसीलदार सैफूल नदाफ, तंत्र अधिकारी श्री.कटके, कृषि अधिकारी रामचंद्र कांबळे, तालुक्यातील सर्व निविष्ठा विक्रेते, कृषि मित्र, शेतकरी, शेतकरी महिला बचत गट, तालुक्यातील कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी कृषी विभगाच्या विविध योजनांचा आढावा घेवून, खरीप हंगामासाठी आवश्यक रासायनिक खते, युरिया व बी-बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध राहिल याची दक्षता घ्यावी तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची परिणामकारकपणे अंमलबजावणी करावी, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यात कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. तालुका कृषि अधिकारी मनिषा मिसाळ यांनी प्रास्ताविक करून सन 2022-23 मध्ये राबविलेल्या योजना व खर्चाचा आढावा सादर केला.
यावेळी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या माहितीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. महाडीबीटी अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजनेमधून तीन लाभार्थ्यांना ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. तसेच कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी सोलापूरचा रेक पॉईंट सुरु करण्याबाबत विनंती केली.
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती पत्र आमदार देशमुख यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी महिला शेतकरी सौ. महानंदा शिंदे व शेतकरी घनशाम गरड यांनी आपले मत व अनुभव व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि अधिकारी अभिषेक सावते यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ कृषि अधिकारी कृष्णा थिटे यांनी केले.