नाशिक : सिन्नर ते घोटी दरम्यान मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर पथावर सुरु आहे. मात्र सायंकाळच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे ते गांगडवाडी परिसरातील समृद्धी महामार्गाचा ब्रिज काम सुरू असताना अचानक ब्रिज कोसळला आहे. सुदैवाने सायंकाळच्या सुमारास काम बंद असल्याने जीवितहानी टळली आहे.
समृद्धी महामार्ग उद्घाटनापासूनच या ना त्या कारणाने चर्चेत आला आहे. उद्घाटन झाल्यानंतर 120 च्या गतीने वाहने धावत आहेत. मात्र अपघातांच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. अशातच इगतपुरी परिसरात बेळगाव तऱ्हाळे गावानजीक ब्रिजचं काम सुरू आहे. मात्र प्रगती पथावर असलेला ब्रिज अचानक कोसळल्याची घटना घडली. सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर असलेला ब्रिज कोसळल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.