कोलकाताचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंहने सलग पाच षटकार मारत कोलकाता नाईट रायडर्सला गुजरात टायटन्सवर तीन विकेट्सने विजय मिळवून दिला. शेवटच्या पाच चेंडूंवर केकेआरला विजयासाठी 28 धावांची गरज होती. यावेळी रिंकूने संपूर्ण संघाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत शेवटच्या षटकात दमदार खेळी केली. रिंकूने शेवटच्या पाच चेंडूंवर सलग पाच षटकार ठोकत गुजरात टायटन्सचा जोरदार झटका दिला. रिंकू सिंहने असे जबरदस्त षटकार ठोकले की, गुजरातचा संघासह मैदानावर उपस्थित सर्वांच्यात भुवया उंचावल्या. अलिगडमध्ये जन्मलेल्या रिंकू सिंहचा क्रिकेटमधील आतापर्यंत प्रवास सोपा नव्हता. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करुन तो येथे पोहोचला आहे.
कोलकाताच्या विजयाचा ‘बादशाह’ रिंकू सिंह
इंडियन प्रीमियर लीगमध्ये 9 एप्रिलला (रविवार) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील सामना आयपीएलच्या इतिहासात आणि चाहत्यांच्या मनात कायमचं स्थान मिळवून गेला आहे. हा सामना चाहते अनेक वर्षे विसरणार नाहीत. कोलकाताच्या विजयात रिंकू सिंहची मुख्य भूमिका होती. डावखुरा फलंदाज रिंकू सिंहने सामन्याच्या शेवटच्या षटकात दमदार खेळी केली. त्याने अप्रतिम फलंदाजी दाखवला, याचं आता सर्वत्र कौतुक होतं आहे.
6 चेंडूमध्ये आणि 29 धावांचं लक्ष्य भेदलं
कोलकाताकडे शेवटचे 6 चेंडूमध्ये आणि 29 धावांचं लक्ष्य होतं. यानंतर रिंकू सिंहनं धुरा सांभाळली. जवळजवळ अशक्य वाटणारी कामगिरी करुन दाखवली आणि यानंतर सर्वांच्या तोंडून फक्तच एकच नाव ऐकायला मिळालं ते म्हणजे रिंकू सिंह. रिंकूने सलग 5 चेंडूत 5 षटकार मारत कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला.
कोलकाता नाईट रायडर्सलाला शेवटच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज होती आणि त्यांचा पराभव जवळपास निश्चित दिसत होता. गुजरात टायटन्सचा कर्णधार राशिद खानने डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालकडे शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी सोपवली. यश दयालच्या पहिल्याच चेंडूवर उमेश यादवने एक धाव घेत रिंकू सिंहला स्ट्राईक दिली. यानंतर रिंकूने सलग पाच षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
रिंकू सिंहने मोडले अनेक विक्रम
रिंकूने केकेआरला विजय मिळवून देत अनेक विक्रम मोडले आहेत. रिंकूपूर्वी, कोणत्याही खेळाडूने टी20 लीग किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 20 व्या षटकात सलग 5 षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला नव्हता. शेवटच्या षटकात सर्वाधिक 29 धावा देऊन विजयाचा विक्रमही रिंकूच्या नावे झाला आहे. यापूर्वी महेंद्र सिंह धोनीने 20 व्या षटकात 23 धावा देत चेन्नईला विजय मिळवून दिला होता.
20 लाखांची अपेक्षा कोलकाताने 80 लाखांना विकत घेतलं
कोलकाताने रिंकूला 80 लाख रुपयांना विकत घेतलं, पण रिंकूला फक्त 20 लाख मिळतील अशी अपेक्षा होती. तेही त्यांच्यासाठी पुरेसे होतं, कारण त्याची घरची परिस्थिती फार हलाखीची आहे. रिंकू आयपीएलमधील सर्वात स्टार क्रिकेटर बनला आहे, पण एक काळ असा होता जेव्हा रिंकू गॅस सिलेंडर पोहोचवायचा. त्याच्यावर कोचिंग सेंटरमध्ये झाडू मारण्याची आणि लादी पुसण्याचीही वेळ आली होती.
रिंकूने एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “दिल्लीतील एका स्पर्धेत मालिकावीर ठरल्यानंतर मोटरसायकल मिळाल्यावर कुटुंबीयांचा त्याचावर विश्वास वाटू लागला. पैशाची गरज होती त्यामुळे माझ्या भावाला काही काम मिळवून देण्यास सांगितलं. त्याने मला कोचिंग सेंटरमध्ये झाडू मारणं आणि लादी पुसण्याची नोकरी दिली. पण मी काही दिवसांनंतरच नोकरी सोडली आणि हे काम करण्यास नकार दिला. मला माहित आहे की क्रिकेट माझ्यासाठी सर्व काही आहे. त्यानंतर मी फक्त खेळावर लक्ष केंद्रित केलं.”
मोहम्मद जिशान आणि मसूद अमीन या दोन व्यक्तींनी रिंकू सिंहला मदत केली. मसूद अमीनने लहानपणापासूनच रिंकूला क्रिकेटचे प्रशिक्षण दिलं आहे, तर 16 वर्षांखालील ट्रायल्समध्ये दोनदा अपयशी ठरल्यानंतर झीशानने या क्रिकेटरची खूप मदत केली. खुद्द रिंकू सिंहनेही एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता.
कोण आहे रिंकू सिंह?
रिंकू सिंहचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी अलिगढ, उत्तर प्रदेश येथे झाला. तो पाच भावंडांमध्ये तिसरा आहे. रिंकूच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे ते गॅस सिलेंडर डिलिव्हरी करायचे.
‘या’ कारणामुळे खाल्ला वडीलांचा मार
रिंकूला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती, पण आपल्या मुलाने या खेळात वेळ वाया घालवू नये, असं रिंकूच्या वडिलांना वाटत होतं. त्यामुळे रिंकूने अनेक वेळा वडीलांचा मारही खाल्ला आहे. पण तरीही रिंकूनं क्रिकेट खेळणं सुरूच ठेवलं. दिल्लीतील एका स्पर्धेत त्याला बक्षीस म्हणून बाईक मिळाली, जी त्याने वडिलांना दिली. त्यामुळे रिंकूवर वडीलांनाही विश्नास वाटला. त्यांनी रिंकूला मारणं सोडलं. पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. अशा परिस्थितीत रिंकूने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याने क्रिकेटसाठीची मेहनत कायम ठेवली.
अखेर 2014 मध्ये रिंकूच्या मेहनतीला फळ मिळालं. त्याला उत्तर प्रदेशसाठी लिस्ट-ए आणि टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. रिंकू सिंहनेही पंजाबविरुद्ध दोन वर्षांनंतर प्रथम श्रेणी पदार्पण केले. त्यानंतर रिंकूने मागे वळून पाहिले नाही. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली. आयपीएल 2017 च्या लिलावात रिंकूला किंग्स इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्स) ने 10 लाख रुपयांना विकत घेतलं. मात्र, त्या मोसमात त्याला एकच सामना खेळता आला.
2018 पासून कोलकाता संघात
2018 च्या मोसमात, रिंकू सिंहला कोलकाता नाईट रायडर्सने 80 लाख रुपयांना आपल्या संघात सामील केलं होतं. तेव्हापासून तो केकेआरशी जोडला गेला आहे. मात्र, आयपीएल 2021 च्या मोसमात तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकला नाही. रिंकूला केकेआरने आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात 55 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. आयपीएलमध्ये रिंकूनं आतापर्यंत 20 सामने खेळले असून 24.93 च्या सरासरीने 349 धावा केल्या आहेत. आयपीएल 2022 मध्ये लखनऊविरुद्धच्या सामन्यात रिंकूने अवघ्या 15 चेंडूत 40 धावा केल्या होत्या, त्यानंतर रिंकूचा डाव ओसरला होता.