पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील वाघांच्या संख्येची नवीन आकडेवारी जाहीर केली. देशातील वाघांची संख्या ३ हजार १६७ झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. कर्नाटकतील बांदीपूर मुदुमलाल व्याघ्र प्रकल्पाच्या दौऱ्यानंतर त्यांनी वाघांची संख्या जाहीर केली आहे.

याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, चार वर्षात देशात 200 वाघ वाढले. जगभर वाघांची लोकसंख्या कमी होत असताना भारतात वाघांची संख्या वाढत आहे. याचं कारण म्हणजे भारतीय समाजातील जैवविविधतेची आपली नैसर्गिक इच्छा आपल्या यशामध्ये दडलेली आहे. आम्ही इकोलॉजी आणि इकॉनॉमी यांमध्ये फरक करत नाही, पण दोघांमधील अस्तित्वाला महत्त्व देतो.
वाघाशी संबंधित हजारो वर्षांचा इतिहास आपल्याकडे आहे. मध्यप्रदेशातील 10 हजार वर्षे जुन्या रॉक आर्टमध्ये वाघांची चित्रे आहेत. वाघांना वाचवण्यासाठी 50 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रोजेक्ट टायगरच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. यासोबतच त्यांनी आज देशातील वाघांच्या संख्येची आकडेवारीही जाहीर केली. सकाळी अकराच्या सुमारास वाघांची संख्या जाहीर करण्यात आली.
प्रोजेक्ट टायगर हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान म्हणाले की, मी गुजरातमध्ये असताना सिंहांवर काम केले. त्यासाठी स्थानिक लोक आणि प्राणी यांच्यात भावना आणि अर्थकारणाचे नाते असायला हवे हे मी तिथे शिकलो. म्हणूनच आम्ही गुजरातमध्ये वन्यजीव मित्र कार्यक्रम सुरू केला. आम्ही गिरमध्ये पुनर्वसन केंद्र सुरु केले, तिथे वनपालांची भरती केली. कारण सिंह असतील तर आपण आहोत, आणि आपण असू तर सिंह जगतील, ही भावना दृढ केली. गीरमध्ये आता पर्यटनाचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे प्रोजेक्ट टायगरच्या यशालाही अनेक पैलू आहेत. त्यामुळे पर्यटकांचा कल वाढल्याचेही यावेळी त्यांनी सांगितलं.