अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस आयुक्तांचं आवाहन
छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री 1 च्या सुमाराला दोन गटांत राडा झाला असून खासगी आणि पोलिसांच्या एकूण 13 गाड्या जाळण्यात आल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं आहे.
रामनवमीच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शहराच्या नामांतराच्या महिनाभरानंतर संभाजीनगरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमी राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटानं जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली. पाहता पाहता घटनेनं रौद्ररूप धारण केलं. पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्या. काही पोलीस जखमी झाल्याचंही वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत 12 गोळ्या झाडल्या. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागातील मंदिरात मध्यरात्री गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. मंदिराच्या प्रवेशद्वारावर हल्ला करण्यात आला. मध्यरात्री एक वाजता ही घटना घडली. पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या आणि खासगी मिळून अशा एकूण 13 गाड्या जाळल्या गेल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.