आळंदीत आज (26 मार्च) ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराचे वितरण होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता फ्रुटवाला मैदान इथं हा सोदळा संपन्न होणार आहे. यावर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर, स्वामी श्री गोविंददेव गिरी तसेच महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना प्रदान करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या पुरस्कारांच वितरण होणार आहे. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उपसभापती निलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचं स्वरुप
दरवर्षी राज्य शासनाच्या वतीनं संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी देखील या पुरस्काराचे वितरण होणार आहे. संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीनं प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारानं सन्मानित करण्यात येते. पाच लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे यांना 2019-20 साठीचा, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांना 2020-21, स्वामी श्री गोविंददेव गिरी यांना 2021-22, महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना 2022-23 साठीचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
यापूर्वी पुरस्कार मिळालेले मानकरी
यापूर्वी ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, श्रीमती उषा देशमुख, ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते, डॉ. किसन महाराज साखरे, मधुकर जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे.
भक्तीसागर या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन
पुरस्कार प्रदान समारंभाप्रसंगी भक्तीसागर या भक्तीमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे, कार्तिकी गायकवाड, समीर अभ्यंकर, आसावरी, विशाल भांगे, भजनसम्राट ओमप्रकाश हे भक्तीगायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. तर कमलेश भडकमकर हे संगीत संयोजन करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन प्राची गडकरी करणार आहेत. तर पुरस्कार प्रदान समारंभप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचालनालय निर्मित ‘अवघा रंग एक झाला’ आणि ‘हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील रॉबीनहूड दत्तोबा भोसले मातोळकर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रमाला सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.