सुभाष देशमुखांनी उदय पाटलांवर सोपवली मोठी जबाबदारी
- मुंबई : सोलापूरच्या राजकारणातील युवा चेहरा उदय पाटील यांनी आज (ता. २१ मार्च) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. उदय पाटील यांच्या भाजप प्रवेशाने दक्षिण सोलापूर आणि सोलापूर शहर उत्तरमधील राजकीय समीकरणाला आणखी बळकटी येऊ शकते. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करताच काँग्रेसमुक्त सोलापूर जिल्हा करण्याची जबाबदारी उदय पाटील यांनी आपल्या खांद्यावर घ्यावी, असे सांगून माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांच्यावर एकप्रकारची जबाबदारीच टाकली।
- दादाश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून उदय पाटील हे सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील आमदार श्रीकांत भारतीय यांच्या माध्यमातून पाटील हे भाजपच्या जवळ गेले होते. मागील दौऱ्यात श्रीकांत भारतीय यांनी उदय पाटील यांच्या घरी भेट दिली होती. त्यावेळीच पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सोलापुरात रंगली होती.
- खुद्द उदय पाटील यांनीही हिंदुत्वाची भाषा करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार श्रीकांत भारतीय, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
- दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी उदय पाटील यांना भाजप प्रवेशाबाबत शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, सोलापूर जिल्हा आता बऱ्यापैकी भाजपमय झाला आहे. फक्त माढा आणि करमाळा तेवढा राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसमुक्त भारत असे स्वप्न आहे. पण तुम्हा आम्हाला सोलापूरमुक्त काँग्रेस करून मोदींचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली, तर सोलापुरात कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला करायचे आहे. काँग्रेसमुक्त सोलापूर करण्याची जबाबदारी उदय पाटील यांनी घ्यावी आणि गुढी पाडव्याच्या दिवशी त्यांनी भाजपयुक्त आणि काँग्रेसमुक्त सोलापूर जिल्हा अशी संकल्पना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.