माझे वय आता 63- 64 असून माझ्या लहानपणापासून मी मनोहर गणपत सपाटे यांना ओळखतो. माझे वडील नागनाथ जाधव हे तमाशा थिएटर चालवत होते .या थिएटरमध्ये कादर पठाण नावाचा मॅनेजर होता, तर डोअरकीपर म्हणून कोकाटे मामा होते. 1963-64 साली मनोहर सपाटे हे दहा- अकरा वर्षाचे असताना आमच्या थिएटर मध्ये लक्ष्मण माने, भीमराव होमपारखे यांच्या ओळखीने बॉय म्हणून कामाला आले . तमाशा थिएटरच्या स्टेज वरचा पडदा ओढण्यासाठी म्हणून त्यांना काम दिले. पडद्याचे वजन 60 ते 70 किलो , त्याला वाळूच्या पिशव्या बांधलेल्या असायच्या ,असे हे पडदे ओढायचे काम मनोहर करत होता .मनोहर सपाटे यांच्या कठोर कष्टाला इथेच सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. हजेरी पत्रकावर वडिलांनी त्यांची नोंद घेऊन कामाच्या या मोबदल्यात त्यांना पाच रुपये पगार ठरविला .
लता- लंका नांदुरीकर, लक्ष्मी- जयश्री कोल्हापूरकर अशा अनेक नामवंत पार्ट्या या थिएटरला चालू असायच्या . त्यावेळी तमाशा थेटर मध्ये मुनीम म्हणून दत्तू मस्के जी एम ग्रुपचे अध्यक्ष मा बाळासाहेब वाघमारे यांचे सासरे थोड्याच दिवसापूर्वी त्यांचे नुकतेच निधन झाले काम करायचे. सपाटे यांच्याकडूनही काम करून घेण्याची जबाबदारी त्यांचीच होती, तेही मनोहर सपाटे यांचे चांगले दोस्त झाले.
रात्री बारा साडेबारा वाजता तमाशाचे थिएटर सुटायचे .दरवाजे बंद करून रात्री एक च्या पुढे मनोहर सपाटे यांचे काम संपायचे . त्यांच्या राहत्या निराळे वस्ती रोडला घनदाट झाडी ,चिखल ,कुत्र्यांचे भुंकणे या सगळ्या गोष्टीमुळे एवढ्या उशिरा रात्री ते घरी जात नसत . रात्रीचा वेळ वाया जाऊ नये म्हणून रात्री दीड च्या पुढे ते वृत्तदर्शन चे पोपटराव मेनकुदळे यांच्या वडिलांच्या भजीच्या गाडीवर प्लेटा धुण्याचे, भांडी घसण्याचे काम करायचे . या मोबदल्यात त्यांना भज्यांचा चुरा , शिल्लक राहिली तर भजी खायला मिळायची. त्यानंतर भागवत थिएटर च्या पायरीवर ते झोपायचे. भागवत थेटर च्या पायरीवर मनोहर झोपत असल्याचे आमच्या वडिलांना समजले. त्यांनी मनोहरला विचारले ए बारक्या तू रात्री भागवत थिएटरच्या पायरीवर का झोपतो? घरी जायला रात्री भीती वाटते म्हणून इथे झोपत असल्याचे मनोहर ने सांगितले . त्यावेळी मनोहर सपाटे यांना आमच्या घरचे व बाहेरचेही सर्वजण बारक्याच म्हणायचे. आप्पांनी तरटी नाक्याच्या पाठीमागे महानगरपालिका शाळेच्या जवळ तमाशातील बायकांना राहण्यासाठी घेतलेल्या वाड्यामध्ये मनोहर सपाटे म्हणजेच बारक्याला राहण्याची परवानगी दिली. तमाशा थेटर ची कामे संपल्यावर ते या वाड्यातील तमाशाच्या बायका बरोबर वडापाव – भजी खाऊन रमू लागले. यावेळी तरटी नाक्यावरील वेश्या शांताबाई च्या रूम पासून सगळ्यांची जवळीक त्यांना लाभली. इथेही गप्प बसेल तो बारक्या कसला ? तमाशाच्या कार्यक्रमात नाचणाऱ्या बायकां शालू घालायच्या. त्या चुरगळलेल्या शालूला पडलेल्या घड्या हाताने नीट करून शालूंच्या घड्या घालण्याचे काम रात्री दीडच्या पुढे मनोहर सपाटे करू लागले. एका शालूच्या घडी साठी दहा पैसे मिळायचे. यानुसार रात्रीही बारक्याचे उत्पन्न सुरू झाले. मेहनतीचे काम करावे लागायचे ,भूक भागायचे नाही म्हणून आमच्या घरून आमची आई गीताबाई नागनाथ जाधव उर्फ आक्का रोज रात्री मनोहर सपाटे यांना एक भाकरी, काय असेल ती भाजी कापडात कधी कागदात गुंडाळून द्यायची. बारक्याला फुकट कोणी काही कधी दिले नाही आणि ते त्यानेही घेतले नाही. एका भाकरीच्या मोबदल्यात आमची अक्का एक पाण्याची टाकी पंप मारून त्यांच्याकडून भरून घ्यायची. एक पाण्याची टाकी भरायची म्हणजे चार-पाचशे जोर मारल्यासारखे होते. त्यांच्या सदृढ प्रकृतीला हे काम वरदान ठरले . आमची आक्का जणू मनोहर सपाटे यांना मुलगाच मानायची, त्यांनाही आईचे प्रेम मिळायचे. काम केल्याशिवाय भाकरी मिळत नाही, त्यामुळे तेही मनापासून काम करायचे. कोणत्याच कामाला बारक्या कधीही घाबरला नाही . मी व माझा भाऊ सुदामला बारक्या शाळेत नेऊन सोडायचा . त्याला कोणतेही काम सांगा तो नाही असे कधी म्हणत नसे. बारक्याला बहीण नसल्याने आमची बहीण सुशीला हिलाच तो बहीण मानायचा ,अशाप्रकारे तो आमच्या घरातलाच आता मेंबर झाला होता. गल्लीतल्या बायका सुद्धा काशीबाई , पार्वतीबाई, मंडाबाई या सगळ्या बायका आपुलकीने सणावाराला कधी पोळी कधी धपाटे बारक्याला आवडीने खायला द्यायच्या. बारक्या हे सगळं घेऊन तमाशा थेटरात जायचा. बारक्याला खायला मिळालेल्या या पोळ्या धपाटे दत्तू मस्के खायचा आणि दत्तू मस्केचा डबा बारक्या खायचा.मिळालेल्या भाकरीत ही भागीदारी असायची.
बारक्या वेळ मिळेल तेव्हा तमाशा चालू असताना थिएटरच्या बाहेरच्या बाजूला अभ्यास करायचा. लोकांना कुतूहल वाटायचे. त्यावेळी कल्लाप्पा कानडे , शीर्षीकर स्वामी, इंजिनियर शहा, कवी संजीव, सिताराम साळुंखे ही तमाशाला येणारी मंडळी बारक्याकडे कुतूहलाने पाहायची .रात्री तीन पर्यंत जागणारा हा बारक्या लहानपणीच डोळ्यांचा पेशंट झाला . डोळ्याला अंधुक दिसू लागले म्हणून डॉक्टर अलबाळ यांच्याकडे मोफत उपचार त्याच्यावर केले .या सगळ्या संकटाला बारक्या कधी घाबरला नाही, कधी रडला नाही, मला त्रास होतोय असे कधी म्हणाला नाही. या सगळ्या कामाच्या पैशातून त्याच्या घरी धान्य भरून देणे, मोठ्या भावांना कपडे घेणे या सगळ्या जबाबदाऱ्या तो पूर्ण करायचा. मोठे भाऊ बबन सपाटे, सुरेश सपाटे, दत्तात्रय सपाटे, माझे स्वतःचे ,माझा भाऊ सुदामचे लग्न जमवण्याचे सुद्धा काम जबाबदारीने या बारक्याने म्हणजेच मनोहर सपाटे साहेब यांनी केले आहे. लहान असताना सुद्धा त्यावेळेस तो घरातील कर्ता पुरुष असल्यासारखे वागायचा.
एक दिवस तमाशा पार्टीतील लता -लंका नांदुरीकरच्या लहान बहीण सरलाचा कंडा बांधायचा कार्यक्रम झाला. त्या नंतर काही दिवसांनी त्यांची पार्टी इथून कोल्हापूरला जाणार होती, त्यांना निरोप द्यायला सर्व थिएटर मधील कामगार व स्वतः मालक बाहेर आले होते . बारक्या सगळ्यांच्या पाठीमागे उभा राहिला होता . सरला सगळ्यांच्या देखत बारक्याजवळ आली, त्याच्या हातात तिने घड्याळ बांधून त्याचा मुका घेतला आणि हमसून रडायला लागली. एवढी सुंदर सरला बारक्यावर फिदा झाल्याचे सर्वांनी पाहिले. बारक्याही रडायला लागला . ही पार्टी पुढे कोल्हापूरला गेली .दोन दिवसांनी बारक्या तमाशा थेटर मधून गायब झाला. सरलाला भेटायला तो कोल्हापूरला गेला. त्याच्या जीवनातील हा पहिला प्रवास. सरला ला भेटून बारक्या खूप रडला, परंतु त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव होती. गरीबीचे चटके तो सोसत होता, त्यामुळे तो परत आला. पुन्हा कामाला लागला .
भारत इलेक्ट्रिक फोर्स चे मालक एम जी भट साहेब हे बारक्याची धडपड लहानपनापासून बघत होते. त्यांचा एकुलता एक मुलगा मतिमंद होता, म्हणून त्यांनी बारक्याचे कर्तुत्व पाहून त्याला विकत घेण्याचे ठरवले. ही गोष्ट बारक्याची आई गंगुबाईच्या कानावर गेली .गंगुबाई तावातवाने आप्पा कडे येऊन तुम्ही माझ्या लेकराला विकत आहे का ?म्हणून जाब विचारू लागली. अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला , पण ताईने कोणाचे ऐकले नाही .मला तो आजही प्रसंग आठवतोय. बारक्या जर भट साहेबाकडे गेला असता तर भारत फोर्ज चा मालक झाला असता. तेव्हाच कोट्यावधी रु कंपनीचा मालक झाला असता, पण म्हणतात ना नशिबापुढे कोणाचे काही चालत नाही. बारक्याही धनसंपत्तीला भुलला नाही . यावेळी बारक्या सोळा-सतरा वर्षाचा होता. लक्ष्मी कोल्हापुरे च्या पार्टीत जयश्री नावाची मुलगी होती. ती बारक्यावर मनापासून प्रेम करायची ,बारक्या तिच्या नादाने दहावी नापास झाला आणि शेवटी त्याने आपला गाशा गुंडाळून सोलापूर सोडले. लोकांना वाटले बारक्याने जयश्रीला भुलून तिच्या पाठीमागे गेला की काय? पण मला माहित होते , बारक्या स्त्रीला भुलणारा नाही . त्याला जबाबदारीची जाणीव आहे . त्याच्या आई-वडिलांचे त्यामुळे भांडण झाले. आईला वाटायचे बारक्याला वडिलांनी दारू पिण्यासाठी पैसे पाहिजेत म्हणून विकले की काय ? बारक्याला कोण विकत घेऊ शकते ? पळवून नेऊ शकते ? त्याच्यावर प्रेम करणारे अनेक , पण बारक्या कोणाच्याही प्रेमात अडकला नाही .
बारक्याचे सपाटे साहेब झाले
29 मार्च 1980 त्यांचे लग्न झाले . 1985 ला बारक्या सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेला .बारक्याची भव्य मिरवणूक निघाली .पुढे 1988 ला सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे ते चेअरमन झाले. सगळेजण त्यांच्या सत्कारला आले होते. साहेब- साहेब म्हणून आदराने बोलत होते. आम्ही त्यांचे मोठेपण पाहत होतो. “बारक्याचा ते साहेब एका भाकरीने कधी झाले ?” हे कळलेच नाही .त्यांच्या कर्तुत्वाला, त्यांच्या कामाला कोणी ब्रेक लावू शकले नाही. ” कठोर परिश्रम , नीती, निष्ठा || हीच खरी जीवनाची प्रतिष्ठा|| हे ब्रीद घेऊन ते काम करीत राहिले. एक वेळ बारक्या मला सुरेश मालक म्हणायचा , आता मी त्यांना साहेब म्हणतो. त्यांच्या जीवनाचा प्रवास मी जवळून पाहिला आहे . त्यांना जीवनात कष्टाने मिळालेले हे यश पाहून आजही माझ्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. सख्ख्या भावापेक्षाही बारक्याने आमच्यावर जास्त प्रेम केले. मला महानगरपालिकेत सिटी बस मध्ये नोकरी लावली,माझा भाऊ सुदामला कोर्टात नोकरी लावली, माझा मुलगा शहाजीला शिक्षण संस्थेत नोकरी दिली, सुनेला नोकरी दिली . माझा संसार ताठ मानेने उभा केला. आम्ही दिलेल्या एका भाकरीची जाण ठेवून आमच्या आयुष्यात कायमची भाकरी सपाटे साहेबांनी दिली .असा माणूस पुन्हा होणार नाही .आज मी सिटी बस मधून सेवानिवृत्त होऊन बारा हजार पेन्शन घेऊन सुखी जीवन जगत आहे, या योगदानात माझी पत्नी सुद्धा कुठे कमी राहिली नाही .अनेक लोकांनी घाणेरडे आरोप केले , तिच्या सात्विक शक्तीवर प्रहार केले. जवळचे ,लांबचे सगळ्यांनी नको त्या चर्चा केल्या, पण आम्ही त्याला भीक घातली नाही. रामाच्या सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली तशी आम्हीही अग्नि परीक्षा देत आहोत , बारक्याच्या नव्हे तर सपाटे साहेबांच्या छत्रछायेखाली जगत आहोत . एक काळ बारक्याचा वाढदिवस आमच्या घरी साजरा व्हायचा. पुढे ते राजकारणात मोठे झाल्यावरही आमच्या घरापासून वाढदिवसाची सुरुवात व्हायची पण आता ते दिवसभर लोकांचा सत्कार स्वीकारून रात्री बाराच्या पुढे आमच्या घरी सत्कार स्वीकारायला येतात. यावरून त्यांच्या कर्तुत्वाचे मोठेपण, कामाची भरारी या सगळ्या गोष्टी दिसून येतात. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त माझेही आयुष्य त्यांना लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो , आणि या सत्य कथेला पूर्णविराम देतो. या कथेबद्दल, लेखाबद्दल कोणाला तरी शंका वाटली तरी त्यांनी मला येऊन विचारावे या सर्व गोष्टीचे माझ्याकडे आजही पुरावे मी माझ्या घरी जतन करून ठेवले आहेत .यानंतर त्यांच्या पुढील जीवनातील प्रवासात सरस्वती चौकातील स्वस्तिक मिठाईचे अडव्होकेट जी एन रजपूत वकील व अडव्होकेट शिवशंकर थोबडे वकील साहेब हे साक्षीदार आहेत
लोखकन । सुरेश नागनाथ जाधव