श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आयोजित कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न
सोलापूर – श्री. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या कुस्ती मैदानात कंदरचा सतपाल सोनटक्के मानकरी ठरला. इंदिरा कन्या प्रशाला डाळींबी आड मैदानावर झालेल्या छत्रपती केसरी मुख्य कुस्तीमध्ये गंगावेस तालीमचा कोल्हापूरचा भैरु माने विरुद्ध छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुल कंदरचा सतपाल सोनटक्के यांच्यात झाली. महाराष्ट्र चॅम्पियन व बुलेटचे मानकरी असलेल्या दोघांत २५ मिनिटे खडाखडी झाली. त्यानंतर दोघांनाही कुस्ती निकाली करण्यासाठी १० मिनिटे देण्यात आली. त्यानंतर पहिला गुण घेणारा विजेता ठरेल असे पंचांनी घोषित केले. अखेर सतपालने कब्जा गुण घेत बाजी मारली. धनराज भुजबळ आणि राजनभाऊ जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले.
त्यानंतर झालेल्या २ नंबरच्या संभाजीराजे केसरी कुस्तीत पुण्याच्या स्वप्नील काशीदने समोरून झोळी डावावर सासवडच्या महादेव कचरे यास चितपट केले. महामंडळाचे अध्यक्ष नानासाहेब काळे. उत्सव समिती अध्यक्ष मतीन बागवान, अरुण रोडगे, राजाभाऊ काकडे, बाळासाहेब पुणेकर, बापू डांगे, अमोल भोसले, श्रीकांत घाडगे, अमर दुधाळ यांच्या उपस्थितीत मुख्य दोन कुस्त्यांना चांदीची गदा देण्यात आली. याचे निवेदन अशोक धोत्रे (नरखेड) यांनी केले.
इतर महत्वाच्या कुस्त्या : तात्या जुमाले विजयी विरुद्ध सचिन पाटील (दोघे पुणे), गणेश कलागते (भगवा आखाडा) विजयी विरुद्ध प्रवीण पांगारकर (पुणे), रितेश भोसले (केगाव) विजयी विरुद्ध सचिन मुळे (रामलिंग मुद्गड), रणवीर चव्हाण (भगवा आखाड़ा) विजयी विरुद्ध रोहन भोसले (पंढरपूर), विनायक मनसावले (भगवा आखाडा) विजयी विरुद्ध उदयनराजे खराडे (कामती).