महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत. आज त्यांना निरोप देण्यात आला. राजभवनावर त्यांना नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस आज महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. दरम्यान, आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांची भेट घेऊन निरोप देऊन त्यांचे आभार मानले.
राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांनाही निरोप
राजभवन परिवारातर्फे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निरोप देण्यात आला. यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. ते आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत आहेत. रमेश बैस यांची राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संताष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल तसेच प्राची जांभेकर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला.
भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र लिहिले होते. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता. त्यानंतर 12 फेब्रुवारीला अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला होता. भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वात चर्चित ठरलेले राज्यपाल ठरले आहेत. त्यांनी केलेल्या विविध वक्तव्यामुळं त्यांची जोरदार चर्चा झाली.