कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुक चांगलीच रंगली आहे. भाजपकडून टिळक कुटुंबियांना डावल्यामुळे ब्राम्हण समाजात नाराजी पसरली आहे.
भाजपचे नेते, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कसबा पेठ मतदार संघातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी केलेल्या विधानाला पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते आज (सोमवारी) माध्यमांशी बोलत होते.
“ही निवडणूक बिनविरोध करायची नसल्यामुळे नाना पटोले असे म्हणतात की टिळकांच्या घरात उमेदवारी दिली असती तर आम्ही बिनविरोधचा विचार केला असता. माझे नाना पटोलेंना आवाहन आहे, टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही बिनविरोध करता का?” असा सवाल पाटलांनी पटोलेंना केला आहे.
‘भाजपने चिंचवडमध्ये जगतापाच्या घरात उमेदवारी दिली आहे, त्याठिकाणी आघाडी उमेदवार देणार आहे, त्याचे काय ?’असे रोखठोक सवाल पाटलांनी उपस्थित केला आहे, यावर नाना पटोले काय उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कसबा मतदार संघातून शैलेश टिळक यांना उमेदवारी नाकारल्याने पुण्यात पोस्टर वार सुरू झाले आहे. काही अज्ञातांनी शहरात तब्बल २४ ठिकाणी फलक लावले आहेत.
यावर प्रश्न विचारल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “समज आणि वस्तूस्थिती हे दोन्ही वेगळं समज आहे.समज निर्माण करायला फलक लागतात, वस्तूस्थिती निर्माण करायला काम लागते.भाजपने कुठल्याही समाजावर अन्याय केला नाही. तराजू लावून निर्णय होतात, त्यामुळे कधी हे तर कधी ते असा निर्णय घेतला जातो,”
“कसब्यात टिळकांच्या घरात उमेदवारी दिली असती तर आम्ही ही निवडणूक बिनविरोध केली असती,’ असे पटोले रविवारी म्हणाले होते.
कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.ते आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सध्या कसबा गणपती येथे भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. कसबा पेठ गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती यांची आरती केल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याचे हेमंत रासने यांनी सांगतले.
तर दुसरीकडे काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहे, असे ते म्हणाले.