प्रसिद्ध गायक रॅपर बादशाहने आत्तापर्यंत अनेकदा वकील बदललेत. यापूर्वी त्याला तक्रारीची प्रत देण्यात आली होती. हा वेळकाढूपणा असल्याचा युक्तिवाद रेणू यांनी केला. यावर न्यायालयाने बादशाहचा अर्ज फेटाळला.
एक अश्लील गाणे गायल्याच्या आरोपात प्रसिद्ध गायक रॅपर बादशाह उर्फ आदित्य प्रतीकसिंह सिसोदियाविरुद्ध तक्रार आली होती. प्रकरण न्यायालयात सुरु असताना बादशाहने एकदाही हजेरी लावली नसल्याने त्याला उत्तर देण्याची अंतिम संधी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एस. जाधव यांनी दिली आहे. अन्यथा त्याची बाजू न ऐकताच निकाल दिला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
एक अश्लील गाणे गायल्याच्या आरोपाखाली बादशाह आणि सुप्रसिद्ध पॉप गायक हनीसिंग विरुद्ध पाचपावली पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोघांच्या आवाजाचे नमुने पोलिसांना घ्यायचे आहेत. प्रसिद्ध गायक हनी सिंग यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहे. मात्र, बादशाहचे नमुने घेण्यात आलेले नाहीत. त्याच्या आवाजाचे नमुने घ्यावेत यासाठी तक्रारकर्ते आनंदपाल सिंग गुरुपालसिंह जब्बाल यांनी त्यांचे वकील रसपाल रेणू यांच्यामार्फत अर्ज केला आहे.
बादशाहकडून वेळकाढूपणा असल्याचा आरोप
यावर सुनावणीत बादशाहच्या वकिलांनी तक्रारीची प्रत मागितली होती. मात्र, बादशाहने आत्तापर्यंत अनेकदा वकील बदललेत. यापूर्वी त्याला तक्रारीची प्रत देण्यात आली होती. हा वेळकाढूपणा असल्याचा युक्तिवाद रेणू यांनी केला. यावर न्यायालयाने बादशाहचा अर्ज फेटाळला. तसेच आवाजाच्या नमुन्याबाबत तक्रारकर्त्याने सादर केलेल्या अर्जावर उत्तर देण्याची अंतिम संधी दिली. बादशाहने सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणी दरम्यान उत्तर न दिल्यास त्याच्याविरुद्धच्या अर्जावर त्याची बाजू न ऐकताच निकाल दिला जाईल, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण…
तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ हनीसिंग आणि आदित्य सिंग उर्फ बादशाह यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल करण्यात आली आहे. आनंदपालसिंग जब्बल असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते व्यावसायिक आहेत. जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी 26 एप्रिल 2014 रोजी हनीसिंग व बादशाहविरुद्ध भादंविच्या कलम 292, 293 व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67, 67 A अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाच्या एका आदेशाविरुद्ध दोन्ही गायकांनी उच्च न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल करून पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती. ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने वादग्रस्त आदेश रद्द केला होता. यानंतर दोघांनीही दुसऱ्यांदा पाचपावली पोलीस ठाण्यात हजेरी लावली पण, पोलिसांना आवाजाचे नमुने दिले नाही. यानंतर हनीसिगं यांनी आवाजाचे नमुने दिले मात्र बादशाह ने अद्याप नमुने दिलेले नाही.