शारदा प्रतिष्ठान ,सोलापूर संचलित सायकल लवर्स सोलापूर यांचेकडून सीएलएस सायक्लोथोन 2023 या सायकल स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेचा एक्सपो कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी कार्यक्रम स्थळी म्हणजे बाळे येथील लक्ष्मीतरु मंगल कार्यालय येथे सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणार आहे . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहराचे उपायुक्त व सायकलिस्ट डॉ. विजय कबाडे हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते सायकलिस्ट स्पर्धकांसाठी देण्यात येणाऱ्या गुडी बॅगचे अनावरण व वितरण करण्यात येईल. याशिवाय सोलापुरातील आयरन मॅन, लोहपुरुष, व विशेष कामगिरी केलेल्या सायकलिस्ट यांचे यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धक सायकलिस्ट यांना टाइम टॅग देऊन त्यांच्या सायकलची तपासणी व आवश्यक दुरुस्ती सायकल दुकानदार अविनाश कुरापती व माणिक बाईक स्टुडिओचे स्वप्निल नाईक यांचेकडून एक्स्पो च्या ठिकाणी करण्यात येणार आहे.
रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात होईल. ही स्पर्धा 25 किमी आणि 50 किमी अंतराच्या दोन गटात होणार असून टाईम मशीन द्वारे प्रत्येक स्पर्धकाच्या वेळेचे मूल्यमापन करून स्पर्धेत अव्वल येणाऱ्या स्त्री-पुरुष कॅटेगरीतील सायकल स्पर्धकांची नावे स्पर्धा पूर्ण होताच जाहीर केली जातील. विजेत्या स्पर्धकांना सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
फिटनेस चांगला ठेवण्यासाठी आरोग्यदायी तसेच पर्यावरण पूरक व सुरक्षित व्यायाम प्रकार म्हणून सायकलिंग ला प्राधान्य दिले जाते. गत पाच वर्षापासून सायकल लवर्स सोलापूर यांचेकडून विविध उपक्रमाद्वारे सायकलिंग चे महत्व अधोरेखित करणारे उपक्रम राबवले गेले आहेत. कोरोना काळात लोकांना याचे महत्त्व समजले आहे त्यामुळे सोलापुरात सायकलिंग कम्युनिटी वाढत आहे. यंदाच्या स्पर्धेला सोलापूर सह पंढरपूर, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर माढा आदी विविध सायकल क्लबच्या सदस्यांनी उत्साहाने भाग घेतला आहे. त्यामुळे ही स्पर्धा उत्तमरीत्या पार पडण्यासाठी सायकल लवर्स सोलापूरचे सदस्य चंद्रकांत दुधाळ, बालाजी सुरवसे, इंजिनिअर अद्वैत लवटे, प्रभाकर चव्हाण, प्रदीप कदम यांची टीम परिश्रम घेत आहे. सोलापूरकरानी ही स्पर्धा अनुभवण्यासाठी व स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक महेश बिराजदार ,इंजिनियर अमेय केत, डॉक्टर प्रवीण ननवरे,अविनाश देवडकर,प्रवीण जवळकर यांनी केले आहे.