सोलापूर : राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. मंगळवेढा तालुक्यातील कार्यक्रम संपवून त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. तत्पूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात फेरफटका मारत अचानकच फायलींची झाडाझडती घेतली. आयुक्त आल्याचे समजताच कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली आणि फायली तपासताना कर्मचाऱ्यांची चांगलीच भांबेरी उडाल्याचे चित्र दिसून आले.
मागील काही महिन्यांपासून तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार हे लाचलुचपत विभागाच्या कारवाईत सापडल्याने तसेच शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांच्या चौकशा लागल्याने सोलापूर जिल्हा परिषदेचा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. पुणे शिक्षण उपसंचालक विभागात सोलापूर म्हटले की थट्टा केली जात असल्याचं ऐकण्यास मिळालं. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त मांढरे हे सोलापुरात आहेत त्यांचे दुपारी पावणे चारच्या दरम्यान जिल्हा परिषदेत आगमन झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रभारी शिक्षण अधिकारी सुलभा वटारे व संजय जावीर यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांचा ताफा शिक्षण विभागाकडे वळाला.
सोबत उपसंचालक औदुंबर उकिरडे होते, माध्यमिक शिक्षण विभागात जाताच मांढरे यांनी उकिरडे यांना तात्काळ रजिस्टर चेक करा आणि त्यानुसार फायली चेक करा अशा सूचना दिल्या. त्यामुळे तर कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. यावेळी फाईल चेक करताना कामकाजात बऱ्याच त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. आता यावर आयुक्त मांढरे हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.