सोलापूर : ‘मनुष्यनिर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान’ हे घोषवाक्य घेऊन आपली वाटचाल करणाऱ्या फाउंडेशनच्या वतीने मार्च महिन्यामध्ये बोर्ड परीक्षा झाल्यानंतर दहावीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ‘मास लीडर टॅलेंट सर्च परीक्षे’ (MLTSE) चे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बुरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुरा पुढे म्हणाले, ‘मास लीडर’ म्हणजे स्वतःचा सर्वांगीण विकास साधून जीवनात उत्तुंग यश संपादन करणे आणि मोठ्या जनसमुदायाचे प्रेरणास्थान बनणे. ‘मास लिडर’ बनण्यासाठी आपले उपजत दोष कमी करत चांगले गुण, सवयी, कौशल्य विकसित करता आल्या पाहिजेत. शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक विकास साधता आला पाहिजे. ‘मास लीडर’ घडण्यासाठी, घडविण्यासाठी एक चळवळ उभा करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. समाजातील आणि एकंदरीत देशातील जास्तीत जास्त लोकांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास झाल्यास आणि त्यांनी जीवनात उत्तुंग यश मिळविल्यास आपोआप आपला भारत राष्ट्र विकसित होईल, समृद्ध होईल!
‘मास लिडर टॅलेंट सर्च् परीक्षा’ (MLTSE) पूर्णपणे मोफत असून निवड प्रक्रिया प्रथम फेरीत लेखी परीक्षा व द्वितीय फेरीत तोंडी परीक्षा / मुलाखत असे स्वरूप आहे. बक्षीसांचे स्वरूप प्रथम बक्षीस रुपये 20,000, व्दितीय बक्षीस रुपये 15,000, तृतीय बक्षीस रुपये 10,000, उत्तेजनार्थ 50 बक्षीसे प्रत्येकी रुपये 500 आहे. याशिवाय निवडक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पाच वर्षांसाठी प्रति वर्ष रुपये 10,000 शिष्यवृत्ती सुद्धा देण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न, वर्णनात्मक प्रश्न असतील. बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान, सामान्यज्ञान, कल्पनाविस्तार, लेखन कौशल्य इत्यादींवर आधारीत ही परिक्षा असेल. या परिक्षेच्या आयोजनासाठी शिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी अशोक भांजे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://forms.gle/BLnG73zn42XZZ6sk6 या गुगल लिंकद्वारे फॉर्म भरून आपली नाव नोंदणी करावी, अधिक माहितीसाठी 9420488991 व 8484090198 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्रीनिवास बुरा पत्रकार परिषदेत यांनी केली आहे.