सोलापूर : मसूरी येथे देशातील 170 आयएएस दर्जाच्या अधिकार्यांसाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. मसुरी येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांचे प्रशिक्षणात सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविलेले सायकल बॅंक उपक्रमाचे सादरीकरण सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. सायकल बॅंकेच्या उपक्रमाची देशपातळीवर दखल घेणेत आली आहे.
- मसुरी येथील लाल लाल बहादूर शास्त्री अकॅडमी या संस्थेत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूरात सुरु असलेल्या उपक्रमाचे प्रेझेंटेशन दिले. हा उपक्रम अन्य राज्यात सुरु करण्याचा मानस यावेळी उपस्थित अधिकार्यांनी केला. ग्रामीण विकासावर यावेळी झालेल्या मंथनांचा सार घेत सोलापूर जिल्ह्यात 2030 पर्यटन केंद्र विकसीत करण्याचा अजेंडा समोर घेण्यात येणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.
- मसूरी येथील प्रशिक्षणाचा कालावधी पुर्ण करुन सोमवारी स्वामी यांनी प्रभारी सीईओ मनिषा आव्हाळे यांच्याकडून पदभार हाती घेतला. सांयकाळी त्यांनी मसूरी येथील प्रशिक्षणाबाबत पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली. प्रशिक्षणामुळे प्रशासकीय कारभारात गतीमानता व पारदर्शकता आणण्यासाठी नवे बळ व ज्ञान मिळाल्याची भावना यावेळी स्वामी यांनी व्यक्त केली.
- सोलापूरची सायकल बँक उपक्रम राज्यातील अन्य जिल्ह्यात राबविण्यासाठी महिला अधिकार्यांनी यावेळी अधिक स्वारस्थ दाखविले. यासाठी त्यांनी आवश्यक ती माहिती जिल्हा परिषदेकडून घेतली आहे. सोलापूरचा हुरडा महत्वपुर्ण आहे. सोलापूरात जाणिवपुर्वक ग्रामीण पर्यटन विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यातून किमान दोनशे कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित धरण्यात आले आहे.
- मसूरी येथील प्रशिक्षण कालावधीत सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत विविध विषयावर देेशातील व जगभरातील तज्ञ व्यक्तींकडुन मार्गदर्शन अधिकार्यांना करण्यात आले. 2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पुर्ण होत आहेत. त्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रशासकीय यंत्रणा कशी असेल, प्रशासकीय कारभारात त्यासाठी काय बदल अपेक्षित आहे, तंत्रज्ञानाची जोड करुन प्रशासनात गतीमानता व पारदर्शकता कशा पध्दतीने आणता येतील यावर सविस्तर मार्गदर्शन उपस्थित अधिकार्यांना करण्यात आले असल्याचे स्वामी यांनी पत्रकारांना सांगितले.