सोलापूर : नाट्य क्षेत्रात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या सतीश तारे करंडक स्किट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट स्कीटचे प्रथम पारितोषिक सोलापूरच्या थिएटरकर या संस्थेला मिळाले. विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित या राज्यस्तरीय स्कीट स्पर्धेत सोलापूरातील हरहुन्नरी कलावंत अभिजीत केंगार याने लिहीलेल्या ‘प्रपोजल’ या प्रहसनास अर्थात स्कीटला सर्वोत्कृष्ट सांघिक स्किट प्रथम पारितोषिक मिळाले.
तसेच अभिजीत केंगार याला अभिनेते दिग्दर्शक आणि गीतकार श्रीरंग गोडबोले यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट पुरूष अभिनयाचे पण प्रथम पारितोषिक मिळाले. राज्यभरातून ३८ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. प्राथमिक फेरीतून अंतिम स्पर्धेसाठी नऊ संघाची निवड झाली होती आणि या नऊ संघाची स्पर्धा पुणे येथील भरत नाट्य मंदिर या नाट्यगृहात झाली. या स्पर्धेतील स्कीटचे चित्रीकरणही करण्यात आले. संतोष पवार, सुयश टिळक, विशाल इनामदार व श्रीकांत यादव हे दिग्गज या स्पर्धेचे परिक्षक होते. लेखन दिग्दर्शन अभिजीत केंगार असलेल्या प्रपोजल या प्रहसनात रोहित लगाडे व प्रज्योत म्हेत्रे यांचे संगीत संयोजन होते. अभिजीत केंगार, प्रसन्न रणशृंगारे व चिदंबर अक्कल यांचा या स्किटमध्ये सहभाग होता.