माढा: इंक्युबेशन सेंटर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आयोजित “सोलापूर स्टार्टअप यात्रा” आज माढा तालुक्यातील कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथे दाखल झाली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी माढा तालुक्यातील विद्यार्थी व नव उद्योजकांशी संवाद साधला , यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की विद्यापीठ स्टार्टअप व नाविन्यता धोरणाची कार्यक्षम पद्धतीने अंमलबजावणी करत असून यामध्ये शहराबरोबरच तालुका व ग्रामीण घटकांना देखील विद्यापीठ प्राधान्य देत आहे तसेच स्टार्टअप द्वारे महिला सबलीकरण शक्य होण्यास मदत होईल असे देखील यावेळी बोलताना त्या म्हणाल्या.
यावेळी नगरपंचायत च्या नगराध्यक्षा मीनल साठे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद भूषवले. यावेळी बोलताना नगरपंचायत स्तरावरून महिला आणि इतर घटकांसाठी व त्यांना सक्षम करण्यासाठी नवं उद्योजकतेवर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र सोलापूरचे सह आयुक्त सचिन जाधव हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी श्री जाधव यांनी उद्योजकता निर्मितीसाठी कौशल्य विकासाची गरज अधोरेखित केली आणि जिल्हास्तरावर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या कौशल्य विकास योजनांची माहिती दिली. उपस्थितांचे स्वागत करताना प्राचार्य डॉक्टर सुनील हेळकर म्हणाले की विद्यापीठ आणि प्रशासनाला एकत्र घेऊन महाविद्यालय नवउद्योजक निर्मितीसाठी सदैव प्रयत्न करेल.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ईनोवेशन इंक्युबेशन अँड लिंकेजेस चे डायरेक्टर सचिन लड्डा यांनी यात्रेची संकल्पना स्पष्ट केली व संस्था स्तरावर राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची दखल घेतली.यावेळी विद्यापीठाच्या उद्यम इंक्युबेशन सेंटरचे मॅनेजर श्रीनिवास पाटील आणि श्री. श्रीनिवास नलगेशी तसेच बसवराज सुतार उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील विद्यार्थी आणि नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्था स्तरावर नव उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले
ही यात्रा उद्या दि.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे दाखल होणार आहे.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे उपप्राचार्य डॉ. अशोक कदम, प्रा. एन. व्ही. शिंदे, प्रा.अलका घोडके, प्रा. घाटगे यांनी परिश्रम घेतले.