प्रिसिजन सामाजिक पुरस्कार आणि ”नाम ” मात्र मकरंद, या दिलख़ुलास गप्पांचा प्रारंभ
• जन-आधार सेवाभावी संस्था व वात्सल्य सामाजिक संस्था यांना प्रिसिजन चे पुरस्कार !
• वेगळ्या ढंगातल्या हिंदी – मराठी गाण्यांनी आणि फ़्युजन्सनी गाजवलेला “कोंकण कन्या बँड”
• “महाराष्ट्राची हास्य जत्रा – बिहाइंड द सीन” या आगळ्या वेगळ्या मुलाखतीतून हास्याचे फवारे अनुभवायला मिळणार
सोलापूर- प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या १४, १५ आणि १६ ऑक्टोबर २०२२ रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे ”प्रिसिजन गप्पा’ आयोजिण्यात आल्या आहेत. सोलापूरकरांना दिवाळी आधी गप्पांची दिवाळी अनुभवता येणार आहे. सलग दोन वर्षांच्या ऑनलाईन गप्पांच्या वेगळ्या अनुभवानंतर यावर्षी प्रत्यक्ष गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा व प्रिसिजन उद्योगसमूहाचे चेअरमन यतिन शहा हे उपस्थित होते. कोरोनाच्या निर्बंधासारख्या श्वास कोंडणाऱ्या वातावरणातून बाहेर पडून जगणं पुन्हा रंगतदार होतंय. सण-उत्सवांना पुन्हा उधाण आलं.अशा उत्सवी आणि मुक्त वातावरणात अधिक भर घालण्यासाठी यावर्षीच्या प्रिसिजन गप्पा घेऊन येत आहोत. अशी माहिती या पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.
प्रिसिजन गप्पांचं हे १४ वं वर्ष. संगीत, नाटक, साहित्य, विविध कलांच्या आस्वादासोबतच सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या गप्पांनी सोलापूरचं सांस्कृतिक पर्यावरण समृद्ध केलं आहे. यावर्षीही अशाच दर्जेदार विषय,आगळ वेगळं व्यक्तिमत्वं आणि त्यांच्या सकस गप्पा असा त्रिवेणी संगम घडणार आहे. यंदाच्या प्रिसिजन गप्पांना शुक्रवार दि. १४ रोजी ऑक्टोबर २०२२ ’प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सुरवात होईल. प्रसिद्ध सिने अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मा. मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदन सोहळा पार पडेल. या वर्षाचा ’प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार हा लातूर येथील जन-आधार सेवाभावी संस्थेच्या संजय कांबळे यांना देण्यात येणार आहे,’प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सन्मानचिन्ह आणि रूपये तीन लाख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तर स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार हा वात्सल्य सामाजिक संस्था, मंगरुळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव. संस्थेच्या उमाकांत मिटकर यांना देण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह आणि रूपये दोन लाख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार सोहळ्यानंतर आपल्या विविधांगी भूमिकांनी चित्रपट रसिकांचे मनोरंजन करत तर कधी गंभीर भूमिकांनी अंतर्मुख करणारे प्रसिद्ध सिने अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांची चित्रपट ते सामजिक प्रवास घडवणारी ” नाम ” मात्र मकरंद, या दिलख़ुलास मुलाखतीचा कार्यक्रम होईल.संभाजीनगरचे प्रेषित रुद्रावार हे ही मुलाखत घेतील. चित्रपट, नाट्य तसेच छोट्या मोठ्या पडद्यावरील एक बहुआयामी व्यक्तिमत्व असा मकरंद अनासपुरे यांचा नावलौकिक आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी विनोदासोबतच अभिनयाच्या विविध छटा साकारल्या आहेत. अभिनय सोबतच सामाजिक कामात त्यांचा मोठा सहभाग आहे. ही मुलाखत सोलापूरकरांसाठी पर्वणी ठरणार आहे.
शनिवार दि.१५ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या दिवशी अल्पावधीतच संगीत रसिकांच्या पसंतीस उतरलेला कोकणातल्या कन्यांचा महाराष्ट्रच नव्हे तर देश गाजवत असलेला भन्नाट बँड
” कोंकण कन्या बँड” हा कार्यक्रम सादर होईल. या बँडमध्ये आरती सत्यपाल, अरुंधती तेंडूलकर, रसिका बोरकर, स्नेहा आयरे, निकिता घाटे, साक्षी मराठे हे कलाकार तर रविराज कोलथरकर हे संगीतकार आपली कला सादर करतील.रविवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतून हास्याचे कारंजे उडवणारे, तमाम मराठी मनाला सतत आपल्या मिष्किल विनोदाने ताजेतवाने ठेवणारे हास्यवीर आपल्या भेटीला येतायत. “महाराष्ट्राची हास्य जत्रा – बिहाइंड द सीन” या आगळ्या वेगळ्या मुलाखतीतून प्रसिद्ध हास्य अभिनेते समीर चौघुले, वनिता खरात, ओंकार राउत, पृथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या हास्याचे फवारे अनुभवायला मिळणार आहेत. गौरव मोरे हे लंडन हून ऑनलाइन कार्यक्रमात उपस्थित राहतील. शुभांगी भुजबळ ह्या या कलाकरांची मुलाखत घेतील. प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे तीनही दिवस सायंकाळी ६.२५ वा. गप्पांना प्रारंभ होईल. नेहमीप्रमाणेच शिवछत्रपती रंगभवनच्या प्रांगणातही आसनव्यवस्था व एलईडी प्रोजेक्टरद्वारे कार्यक्रम पाहण्याची सोय असेल. रसिक सोलापूरकरांनी ’प्रिसिजन गप्पां’चा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन डॉ. सुहासिनी व श्री. यतिन शहा यांनी केले.
पुरस्कारप्राप्त संस्थांचा परिचय जन- आधार सेवाभावी संस्था :- “ कचऱ्यातून रोजगारनिर्मिती ”
लातूर शहरातील कचरा वेचक कष्टकरी समाज घटकांसाठी जन-आधार सेवाभावी संस्था मागील १८ वर्षांपासून कार्यरत आहे. २००४ साली जनसेवा घनकचरा व्यवस्थापन सहकारी संस्थेची स्थपना करण्यात आली. कचरा वेचकांचे कचऱ्यातील ज्ञान व त्या क्षेत्रातील रोजगाराची मोठी संधी याचा समन्वय साधून कामाची सुरवात केली. जनसेवा घनकचरा व्यवस्थापन सहकारी संस्थेला कामाच्या व भौगोलिक रचनेच्या काही मर्यादा येत होत्या म्हणून जन- आधार सेवाभावी संस्थेची स्थपना केली. लातूर शहरात दररोज १५० ते १८५ मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. २०१७ पासून जन आधार सेवाभावी संस्था शहरातील रस्ते झाडणे, घंटागाडीच्या माध्यमातून घराघरातून ओला, सुका कचरा व घातक कचरा गोळा करणे व त्याचे विघटन करणे ही कामे करते.कचरा संकलन, वर्गीकरण ते विल्हेवाट यात एकूण ५ प्रकारची कामे जन- आधार सेवाभावी संस्था करते. १) घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी १२० महिला काम करतात २) शहरातील ५ संकलन केंद्रावर १२५ महिलांच्या माध्यमातून कचरा संकलित करून विघटित करतात ३) ५० महिला नाले सफाई चे काम करतात ४) ८० महिला ह्या रस्ते साफ सफाईचे काम करतात ५) स्वच्छताई म्हणजेच यात ८५ महिला घरोघरी जाऊन ओला, सुका व घातक कचरा या विषयी जनजागृती करतात. या सर्व प्रकल्पात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ८५० लोकांना रोजगार मिळत आहे.
वात्सल्य सामाजिक संस्था :- “ एकल महिलांसाठी आत्मनिर्भरता “
वात्सल्य सामाजिक संस्था ही उमाकांत मिटकरांनी सुरू केली. वंचित, उपेक्षित घटकांसाठी ही संस्था काम करते. या संस्थेचा महत्वाचा उपक्रम म्हणजे “एकल महिलांसाठी आत्मनिर्भरता”. खेड्यापाड्यात अनेक महिला एकटेपणाचं आयुष्य जगत असतात. कुटुंबाने नाकारलेल्या, विधवा, अपंग, नाईलाजास्तव एकटं राहणाऱ्या महिलांची अत्यंत वाईट अवस्था असते. अशा महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी “वात्सल्य सामाजिक संस्था या प्रकल्पाच्या माध्यमातून काम करत आहे.वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एकल महिलांसाठी दिवाळी भाऊबीज निमित्त एक साडी उपक्रम, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, मोफत औषधांचे वाटप तसेच एकल माता भगिनींसाठी स्वयं रोजगार मार्गदर्शन, असे उपक्रम राबविले जातात. संस्थेच्या माध्यमातून गोशाळा ही चालविली जाते. शेतकऱ्यांनी सेंदीय शेतीकडे कल वाळविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या साहाय्याने शेतकरी मळावे संस्था घेत असते. मंगरूळ परिसरात आरोग्य विषयात केलेल्या सर्वेक्षण नंतर संस्थेनी या परिसरातील गावकऱ्यांसाठी एक रुग्ण वाहिका ही सुरु केली आहे. आरोग्य शिबिरे, फिरते दवाखाने आरोग्य जागृती असे उपक्रम संस्था राबवित आहे. मालती- माधव नावाने संस्था एक ग्रंथालय ही चालविते.