माळशिरस : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरिक्षक माळशिरस यांच्या पथकाने 12 जुलै मंगळवारी सकाळी बोलेरो वाहनातून सांगोला तालुक्यात अवैधरीत्या विक्रीकरिता आणण्यात येणारी रु. 1 लाख आठशे किंमतीची देशी विदेशी दारु मानेगाव (ता. सांगोला) येथे जप्त केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 1 जुलै पासून अवैध हातभट्टी ठिकाणे, होटेल, धाबे इ. ठिकाणांवर धाडी टाकण्यात येत असून याच मोहिमेअंतर्गत दिनांक 12 जुलै रोजी गुप्त बातमीदारामार्फ़त मिळालेल्या बातमीनुसार सकाळी 8 वाजेच्या सुमारास निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस संदिप कदम यांनी त्यांचे पथकासह मानेगाव (ता. सांगोला) गावाच्या हद्दीत मानेगाव- वाळेखिंड रोडवर सापळा लावून महिंद्रा बोलेरो क्र. MH-45-A-8477 हे वाहन अडवून त्याची तपासणी केली असता वाहनामध्ये 180 मिली क्षमतेच्या देशी दारु संत्रा स्पेशल या ब्रॅंडच्या 16 पेट्या, देशी दारु टॅंगो पंच या ब्रॅंडच्या 7 पेट्या, रॊयल स्टॅग व्हिस्कीच्या 48 बाटल्या, मॅकडॊवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 48 बाटल्या, इंपेरियल ब्ल्यु व्हिस्कीच्या 48 बाटल्या असा देशी विदेशी दारुचा मुद्देमाल मिळून आला. या कारवाईत 1 लाख आठशे रुपये किंमतीची देशी- विदेशी दारु व वाहनासह एकूण रु. 4 लाख आठशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे सचिन सुभाष शेंडे, रा. कडलास, ता. सांगोला याला अटक करुन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीची सखोल चोकशी केली असता त्याने देशी विदेशी दारु सांगली जिल्ह्यातून अवैधरीत्या सांगोला तालुक्यात विक्रीकरिता आणत असल्याचे तपासादरम्यान सांगितले.
ही कारवाई महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उपआयुक्त पुणे विभाग अनिल चासकर , अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक व उप अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस संदिप कदम, दुय्यम निरीक्षक छत्रे, जवान तानाजी काळे व वाहनचालक दिपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली.
आवाहन राज्य उत्पादन शुल्क
विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून अवैध दारू विक्री, निर्मिती, वाहतूकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मीती /वाहतुक /विक्री /सा ठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा.