येस न्युज मराठी नेटवर्क : अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी आंदोलकांकडून तब्बल पावणेदोन कोटी रुपये जमवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी एसटी संपकरी मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. या काळात गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांकडून ५३० रुपयांप्रमाणे १.८० कोटी रुपये गोळा केले. हे सर्व पैसे गुणरत्न सदावर्ते यांच्याकडेच जमा करण्यात आले होते, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. या पैशांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सरकारी वकिलांनी केली.
गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन दिवसांच्या कोठडीचा कालावधी संपल्याने सोमवारी त्यांना गिरगाव न्यायालयात सादर करण्यात आले होते. या सुनावणीत सरकारी वकिलांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला. यामध्ये त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी आंदोलकांकडून १.८० कोटी रुपये घेतल्याचा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी या गोष्टीवर आक्षेप घेतला. सदावर्ते यांनी ज्या एसटी आंदोलकांकडून ५३० रुपये घेतले आहेत, त्यांच्यापैकी एकाने तरी तक्रार केली आहे का? मग हा मुद्दा न्यायालयात उपस्थित करण्याचे प्रयोजन काय, असा सवाल गिरीश कुलकर्णी यांनी विचारला.