सोलापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि ज्येष्ठ नागरिक मेळावा घेण्यात आला. सामाजिक न्याय भवन येथे आयोजित रक्तदान शिबिरात १३१, संगमेश्वर महाविद्यालयात २५, मोहोळ १७ आणि बार्शी येथे १५ अशा १८८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिरासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचे सहकार्य लाभले. सामाजिक न्याय भवन येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या विशेषाधिकारी सुलोचना सोनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमिक आश्रमशाळा भोगावचे मुख्याध्यापक महेश सरवदे, आश्रमशाळा कामतीचे मुख्याध्यापक जब्बार शेख, सहायक लेखाधिकारी विलास राठोड आदी उपस्थित होते.
भारती विद्यापीठात ज्येष्ठ नागरिक मेळावा
सामाजिक समता कार्यक्रम आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारती विद्यापीठ समाजकार्य महाविद्यालय येथे ज्येष्ठ नागरिक मेळावा घेण्यात आला. जनसेवा फाउंडेशन पुणेचे मिलिंद गायकवाड यांनी ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या विशेषाधिकारी सुलोचना सोनवणे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत कुंभार, भारती विद्यापीठाच्या संचालिका जयश्री मेहता, वालचंद समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा. निशा वाघमारे, हर्षल शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.