पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मोठे व्यक्ती आहेत, मी लहान कार्यकर्ता आहे. त्यावर काय बोलणार, 10 मार्चला सरकार जाणार चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. याशिवाय अजित पवार यांनी अर्थसंकल्प आणि बजाज समुहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या निधनामुळं भारतीय उद्योग क्षेत्रातील पितामह निघून गेल्याची भावना अजित पवार यांनी व्यक्त केलीय.
चंद्रकांत पाटील मोठी व्यक्ती
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मोठी व्यक्ती आहे. मी लहान कार्यकर्ता असून त्यांच्यावर काय बोलणार, अशा शब्दात अजित पवार यांनी टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी पाच राज्यातील निवडणुका संपल्यावर राज्यातील सरकार पडेल, असा दावा केला होता. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये मतभेद वाढत असल्याचं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले होते.