सोलापूर दि. २८ (प्रतिनिधी ) मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त घेतलेल्या काव्य लेखन स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपल्या कवितांमधुन समाज प्रबोधनाचा चांगला संदेश दिला आहे, असे प्रतिपादन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई, महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर आणि महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना महापौरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी महापौरांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगुन काव्यलेखन उपक्रमाचे कौतुक केले. विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले. विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी सोलापुरला साहित्याची मोठी परंपरा लाभली असल्याचे सांगितले. साहित्यामुळेच समाजाकडे बघण्याची द्रुष्टी प्राप्त होते असेही ते म्हणाले.
यावेळी उपायुक्त धनराज पांडे म्हणाले,समाज घडवण्याची ताकद साहित्यात आहे. चार ओळीची कविता क्रांती करते. काव्यलेखन स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य आहे. प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी मराठी भाषेची महती सांगीतली. अतीशय गोड आणि वैभव प्राप्त मराठीचा प्रत्येकाने वापर केला पाहिजे. काव्यलेखन स्पर्धेत आयएमएससारख्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी भाग घेतला आणि बक्षीस मिळवले ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी केले. स्पर्धेतील विजेते शिक्षक विनायक पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांनी भुकंप विषयावरची कविताही सादर केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी अनिल विपत, मसाप जुळे सोलापुरच्या कार्याध्यक्षा सायली जोशी, श्रीकांत कुलकर्णी, शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक मनिष बांगर, सुरेश कासार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुवर्णा गुरव यांनी केले तर गिरीश दुनाखे यांनी आभार मानले.
स्पर्धेतील हे आहेत विजेते
विद्यार्थी गट – दूर्वा उन्हाळे (आयएमएस),आदित्य गणपा (श्री मार्कंडेय विद्यालय),संयुक्ता पाटील (आयएमएस), सुशांत निकंबे (रावजी सखाराम हायस्कूल),संस्कृती जाधव (अण्णाप्पा काडादी प्रशाला)
शिक्षक गट – विनायक पवार (सुयश विद्यालय), वैशाली अघोर (सहस्त्रार्जून प्रशाला),मनिषा मुंढे (मौनेश्वर मराठी विद्यालय), अश्विनी मोरे – वाघमारे (सेवासदन प्रशाला),आदिती कुलकर्णी (माँडेल पब्लिक स्कूल)
साहित्यिक उपक्रमांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करा
साहित्य आणि राजकारण यांचा जवळचा संबंध आहे. अनेक राजकीय नेते साहित्य सहवासामुळे मोठे झाले. साहित्य आणि कलेला राजाश्रय मिळाला पाहिजे. चांगले साहित्यिक उपक्रम राबवण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र तरतूद करावी अशी सुचना विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केली.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मसापच्या पुढाकारातुन महापालिकेच्या हिरवळीवर अशाच पध्दतीने काव्यस्पर्धा घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी जाहीर केले.