येस न्युज मराठी नेटवर्क : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेल्या तरुणाला भारतीय लष्कराकडे सुपूर्द केले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी गुरुवारी ही माहिती दिली. अरुणाचल प्रदेशमधील अपर-सियांग जिल्ह्यातील जिदो गावातील रहिवासी 19 वर्षीय मिराम तारोन हा युवक बेपत्ता झाला होता. चीनच्या सैनिकांनी त्याचे अपहरण केला असल्याचा दावा स्थानिकांनी केला होता.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले की, चीनच्या पीएलएने मिरोम तारोन या युवकाला भारतीय सैन्याकडे सुपूर्द केले आहे. वैद्यकीय व इतर प्रक्रिय पूर्ण झाल्यानंतर या युवकाला त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार आहे. याआधी बुधवारी भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये हॉटलाइनवर चर्चा झाली. यावेळी चिनी सैन्याने सकारात्मक भूमिका घेत युवकाला भारताच्या ताब्यात देण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर या युवकाला भारतीय लष्कराकडे सोपवण्यासाठीचे ठिकाण निश्चित करण्यात आले.