येस न्युज मराठी नेटवर्क : तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज लहान मुलांना शाळेत येण्याची संधी मिळाली . मुलांप्रमाणे शिक्षक देखील आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी उत्सुक होते . पद्मशाली शिक्षण संस्था संचलित , सौ भू म पुल्ली कन्या प्रशालेत आज 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी फुगे बांधून , रांगोळी घालून जय्यत तयारी करण्यात आली . पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथजी गोप , शालेय समिती अध्यक्ष श्रीधरजी चिट्याल , विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थिनींना गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले . याप्रसंगी मुख्याध्यापिका गीता सादुल , उपमुख्याध्यापक युवराज मेटे , पर्यवेक्षिका प्रणिता सामल , उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामुल , अनिल निंबाळकर , मधुकर गवळी आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
बऱ्याच दिवसांनी शाळेत आल्यानंतर विद्यार्थिनींच्या मनातील भीती घालवून त्यांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य फुलवण्यासाठी चार्लीच्या वेशभूषेत नकलाकार अंबादास कनकट्टी देखील उपस्थित होते . विविध पक्षी आणि प्राण्यांचे आवाज काढत त्यांनी मुलींचे सुंदर मनोरंजन केले . आज शाळेच्या आवारात उत्साहपूर्ण वातावरण दिसून आले . मुलींच्या किलबिलाटाने संपूर्ण शालेय परिसरात उत्सवाचे स्वरूप दिसून आले.