मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर वाढीव महागाई भत्त्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन गुरुवारी कमालीचे यशस्वी ठरले. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत कामगार संघटनांची बैठक झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई व वाढीव घरभत्ता देण्याचे राज्य सरकारने अखेर मान्य केले. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे दिवसभर राज्यात प्रवाशांचे मात्र हाल झाले. अनेक स्थानकांवरू एकही गाडी सुटू शकली नाही. ‘कामगार एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी राज्यातील बसस्थानके गुरुवारी दुमदुमली होती. आर्थिक घडी विस्कटलेल्या राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) सावरण्यासाठी १७.१७ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला होता. त्याच वेळी कर्मचाऱ्यांना २५०० आणि अधिकाऱ्यांना ५ हजार दिवाळी बोनस आणि ५ टक्के महागाई भत्ता देण्याचे परिवहनमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी जाहीर केले होते. या तुटपुंज्या वाढीचे संतप्त पडसाद कर्मचाऱ्यांमध्ये उमटले. त्यानंतर राज्यभरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले होते. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी बंद झाल्यास होणारे कोट्यवधींचे नुकसान सरकारला परवडणारे नव्हते. त्यामुळे कामगार संघटनांसोबत चर्चा करून राज्य सरकारने तोडगा काढला.