येस न्युज मराठी नेटवर्क : इंधनदरात झालेली भरमसाट वाढ, टायरसह गाडय़ांच्या सुटय़ा भागांच्या वाढलेल्या किमतीमुळे एसटीच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या सोमवारच्या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महामंडळाने सोमवारी मध्यरात्रीपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू केली.
महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी सेवांना भाडेवाढ लागू होईल. ही वाढ किमान ५ रुपयांपासून १८५ रुपयांपर्यंत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना जादा भाडे मोजावे लागणार आहे. नव्या भाडेवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून, दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच सहा किलोमीटरनंतरच्या तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयांच्या पटीत आहे. भाडेवाढीमुळे दादर ते स्वारगेट शिवनेरीचे तिकीट दर ४५० रुपयांवरून ५२५ रुपये झाले आहे. मुंबई ते दापोली साध्या बसचे दर २९० रुपयांवरून ३४० रुपये, मुंबई ते विजयदुर्गपर्यंत साध्या बसच्या दरात १०५ रुपयांनी वाढ असून, आता ७३० रुपये मोजावे लागतील.